Dehugaon News : सुरक्षा रक्षकाच्या मुलींना अभंग प्रतिष्ठानचा मदतीचा हात

Dehugaon News : सुरक्षा रक्षकाच्या मुलींना अभंग प्रतिष्ठानचा मदतीचा हात

दोन मुलींना शाळेत प्रवेश घेण्यासाठी मदत: शैक्षणिक साहित्य भेट

Pckhabar- देहूगावातील एका गृहप्रकल्पात वॉचमन म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून काम करणारे व मूळ नेपाळ येथील असणारे लक्ष्मण विश्वकर्मा. गेल्या वीस वर्षांपासून कामानिमित्त महाराष्ट्रातच स्थायिक आहेत. अतिशय प्रामाणिक व कष्टाळू असणारे लक्ष्मणदादा अगदी पहाटेपासून मोकळ्या वेळेत घरोघरी जाऊन चारचाकी गाड्या धुवून देण्याचे काम करतात. दोन दिवसांपूर्वी सायकलवर बादली घेऊन निघालेली ही व्यक्ती अचानक माझ्यासमोर येवून थांबली व गाडी धुण्याचे काम मागण्यासाठी त्यांचा संवाद घडला. या संवादातून त्यांची सर्व माहिती घेताना समजले की त्यांच्या घरी त्यांची पत्नी,तीन मुली व एक मुलगा असा त्यांचा परिवार आहे. एक मोठी मुलगी नेपाळ येथेच पाहुण्यांकडे राहते. त्यांच्यासमवेत संवाद साधताना लक्षात आले की दोन लहान मुली घरी आहेत त्यांना शिकण्याची आवड आहे पण प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यांना शाळेत पाठवू शकलो नाही. यामध्ये मागील दोन वर्ष कोरोनाच्या संकटात गेली. हे समजल्यानंतर आम्ही त्यांच्या मुलींना भेटायला गेलो. पुनम व करिष्मा या दोनही मुली अत्यंत हुशार व खूप गोड आहेत. त्या दोन्ही मुलींचे प्रवेश शाळेमध्ये घेऊन देण्यात आले. त्यानंतर या दोन्ही मुलींना सर्व शैक्षणिक साहित्य, ड्रेस अभंग प्रतिष्ठानच्या माध्यमातून भेट देऊन त्यांच्या शैक्षणिक प्रवासास सदिच्छा देण्यात आल्या. आपल्या पुढील शैक्षणिक प्रवासातही आम्ही सहाय्य करू असे त्यांना विश्वासपूर्वक सांगण्यात आले.

पहिल्या दिवशी त्या मुलींना शाळेत सोडवायला गेल्यानंतर पुनम व करिष्मा या दोन्ही मुलींच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिल्यानंतर असं वाटतं जीवनात यापेक्षा मोठा आनंद आपल्याला सुद्धा कोणतीच गोष्ट मिळून देऊ शकत नाही. आनंद वाटल्याने वाढतो असं म्हणतात तो याचमुळे…

आपण सर्वांनी जर एक संवेदनशील मन जागृत ठेवून आपल्या अवतीभोवती आपण जिथे राहतो त्या सोसायटीत किंवा गृह प्रकल्पात घरकाम करणारी महिलाभगिनी असेल, स्वच्छताकाम करणारे सेवक बंधूभगिनी असतील, एखादा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राहणारा कष्टकरी बांधव असेल अशा व्यक्तींची जाणीवपूर्वक विचारपूस करून त्यांच्या कुटुंबातील मुलांचे शिक्षण कसे चालले आहे हे जाणून घेतले पाहिजे. त्यांना काही सहकार्याची गरज असेल तर आपल्या सोसायटीच्या वतीने मित्रपरिवाराच्या वतीने किंवा आपल्या गावातील सामाजिक संस्थेच्या मदतीने त्यांना काही शैक्षणिक प्रवासात आपण सहाय्य करू शकतो का? हे जाणीवपूर्वक केले पाहिजे. ही फक्त आपले कर्तव्य नाही तर आपला समाज म्हणून आपली जबाबदारी आहे.

सेवेचा आनंद व जीवनाचे खरे समाधान खूप लहान लहान गोष्टीतून आपणास मिळवता येतो. फक्त एक संवेदनशील मन कायम जागृत असले पाहिजे. आपल्या अवतीभोवतीच्या प्रत्येक माणसाविषयी आपणास आपुलकी, जिव्हाळा असला पाहिजे. तेव्हा अशा प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करीत असलेल्या किमान एका परिवारातील मुलांच्या शैक्षणिक वाटचालीत आपण सहाय्यक होऊया, असे आवाहन अभंग प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *