Dehugaon News : श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देहूत

 

Dehugaon News : श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देहूत

पंतप्रधानांच्या स्वागताला देहूनगरी सज्ज; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

Pckhabar- श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ( मंगळवार) देहूत येत आहेत. लोकार्पणानंतर दुपारी बारा वाजता पंतप्रधानांची संवाद सभा होईल. यामुळे देहू परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त असून, परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे. स्वच्छता व सुरक्षिततेच्या दृष्टीने मुख्य मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. मंदिर परिसरात पास धारकांनाच प्रवेश दिला जात आहे. वाहतूक मार्गातही बदल केले आहेत.

देऊळवाड्यातील मंदिरांची डागडुजी, रंगरंगोटी पूर्ण झाली आहे. संपूर्ण मंदिर धुऊन सॅनिटायझर फवारण्यात आले आहे. फुलांची सजावट करण्यात आली आहे. चारशे टाळकऱ्यांच्या उपस्थितीत पंतप्रधानांचे देऊळवाड्यात आगमन होईल. शिळा मंदिर लोकार्पण सोहळा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देहू- देहूरोड मार्गावरील माळवाडीत २२ एकरच्या मैदानात सभा होईल. त्यासाठी तीन मंडप उभारले असून, चाळीस हजार भाविकांची बैठक व्यवस्था आहे. कार्यक्रम पाहण्यासाठी स्क्रीनही उभारल्या आहेत. या ठिकाणापासून जवळच तीन हेलिपॅड उभारले आहेत. दुपारी एकच्या
सुमारास पंतप्रधानांचे आगमन होईल. मोटारीने परंडवाल चौक, मुख्य कमानीमार्गे ते चौदा टाळकरी कमानीपर्यंत पोहोचतील. तेथून मुख्य मंदिरापर्यंत मंडप उभारला आहे. त्यात कॉरिडॉर आहे. त्यातून मुख्य मंदिरात आगमन होईल. दोन्ही बाजूला उभे चारशे वारकरी टाळ-मृदंगाच्या गजरात पंतप्रधानांचे स्वागत करतील. मुख्य मंदिरातील दर्शन व शिळा मंदिर लोकार्पण सोहळ्यानंतर पंतप्रधान माळवाडी येथील सभास्थळी रवाना होतील.

पोलिसांनी केलेल्या नियोजनानुसार सभास्थळी जाण्यासाठी चाकण-तळेगाव रस्ता व आळंदी रस्त्याने येणाऱ्या भाविकांना विठ्ठलवाडी येथून नवीन बायपास रस्त्याने आल्यानंतर जुन्या पालखीमागाने सभास्थळी जाता येईल. देहूरोड मार्गे येणारे भाविक झेंडेमळा येथील रस्त्याने येतील. सभास्थळापासून दीड किलोमीटरवर ठिकठिकाणी पार्किंग व्यवस्था आहे. गावातून जाणारे भाविक जुन्या पालखीमार्गाने जातील. देहू प्रवेशद्वार कमान ते देऊळवाड्यापर्यंत नगरपंचायतीने रस्त्याचे डांबरीकरण केले आहे. देहू ते माळवाडी रस्त्यावरील खड्डे बुजविले असून, मुरूम टाकून साईडपट्टया भरल्या आहेत. तीन हजार पोलीस बंदोबस्तासाठी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *