Bhoom News : सावरगांवच्या सरपंचपदी जनाबाई यादव यांची बिनविरोध निवड
ग्रामस्थांना सोबत घेऊन गावाचा सर्वांगीण विकास करण्यावर भर : सरपंच जनाबाई यादव
Pckhabar- सावरगांवच्या सरपंचपदी जनाबाई मच्छिंद्र यादव यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत मोठा जल्लोष केला. ही निवडणूक प्रक्रिया गुरुवारी (दि.27) शांततेत पार पडली.

सात सदस्यांची सावरगांवची ग्रामपंचायत आहे. सावरगांचे सरपंचपद रिक्त झाले होते. त्यामुळे निवडणूक लागली होती. सत्ताधारी गटाकडे चार सदस्यांचे संख्याबळ आहे. सरपंच पदासाठी ज्येष्ठ सदस्या जनाबाई यादव यांचा एकमेव अर्ज आला. छाननीत त्यांचा अर्ज वैध ठरला. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहणा-या विस्तार अधिकारी वाघमारे यांनी जनाबाई यादव यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. बिनविरोध निवड होताच समर्थक, कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

जनाबाई यादव या शेतकरी आहेत. त्या पहिल्यांदाच ग्रामपंचायतीत निवडून आल्या आहेत. वॉर्ड क्रमांक एकचे त्या प्रतिनिधीत्व करतात. त्यांना राजकीय वारसा कुटुंबातूनच मिळाला आहे. त्यामुळे त्या गावचा कारभार व्यवस्थित सांभाळतील असा विश्वास गावक-यांनी व्यक्त केला. सावरगांवमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी सरपंच मधुकर यादव यांच्या त्या भावजय आहेत. निवडणूक प्रक्रियेसाठी उपसरपंच शिवहारी पाटील, माजी सरपंद, विद्यमान सदस्या गोदावरी यादव, शितल अर्जुन महानवर यांनी मोलाचे सहकार्य केले.

पाणी समस्या सोडविण्यास प्राधान्य – सरपंच जनाबाई यादव
निवडीनंतर नवनिर्वाचित सरपंच जनाबाई यादव म्हणाल्या, ”माझी बिनविरोध निवड केल्याबद्दल सहकारी सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करणारा माझा मुलगा जयराम यादव याचे मी मनापासून आभार मानते. निवडणूक झाली की राजकारण संपले. त्यामुळे सर्व ग्रामस्थांना सोबत घेऊन गावाचा सर्वांगीण विकास करण्यावर माझा भर राहील. उन्हाळ्यात ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. पाणीटंचाई भासते. त्यासाठी पाणी समस्या सोडविण्याला माझे मुख्य प्राधान्य राहील. गावातील अंतर्गत रस्ते पक्के करण्यासाठी मनापासून प्रयत्न करणार आहे. सावरगांवचा सर्वांगीण आणि समतोल विकास करण्यासाठी मी कटिब्ध आहे. गावाच्या विकासासाठी सर्व ग्रामस्थांनी देखील सहकार्य करावे”.
बिनविरोध निवडीनंतर सरपंच जनाबाई यादव यांचा ग्रामसेवक हराळ मॅडम यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.










Leave a Reply