Talegaon Dabhade News: स्टेशन परिसरातील कृत्रिम पाणीटंचाईने नागरिक त्रस्त

Talegaon Dabhade News: स्टेशन परिसरातील कृत्रिम पाणीटंचाईने नागरिक त्रस्त

पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास
26 मे रोजी नगरपरिषद कार्यालयावर भव्य मोर्चा-  गणेश काकडे यांचा प्रशासनाला इशारा

स्टेशन भागातील गृहनिर्माण संस्थांना पिण्याचे पाणी टँकरद्वारे घ्यावे लागतेय विकत

Pckhabar- तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील तळेगाव स्टेशन परिसरात गेल्या महिन्याभरापासून अपु-या दाबाने, अनियमित पाणीपुरवठा होत आहे. स्टेशन भागात जाणीवपूर्वक कृत्रिम पाणीटंचाई निर्माण केली असून पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने 26 मे रोजी नगरपरिषदेच्या कार्यालयावर भव्य मोर्चा काढणार असून टाळेठोक आंदोलन करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष गणेश काकडे यांनी दिला आहे.

तळेगाव स्टेशन भागातील पाणीपुरवठा सुरळित करण्याच्या मागणीबाबत शहराध्यक्ष गणेश काकडे यांच्यासह राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे यांना निवेदन दिले आहे.

या निवेदनात शहराध्यक्ष काकडे यांनी म्हटले आहे की,  तळेगाव स्टेशन परिसरात गेल्या महिन्याभरापासून अपु-या दाबाने पाणीपुरवठा होत आहे. या भागातील करदात्या नागरिकांकडून पुरेशा दाबाने, नियमितपणे पाणीपुरवठा व्हावा अशी मागणी सातत्याने होत आहे. तत्कालीन मुख्याधिकारी सतीश दिघे यांच्या काळात शहराच्या सर्व भागाचा समतोल राखून पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत होता. या कालावधीत नागरिकांच्या तक्रारी येत नव्हत्या. परंतु, गेल्या महिन्याभरापासून तळेगाव स्टेशन परिसरातील पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत आहे.

अपु-या दाबाने होणा-या पाणीपुरवठ्यामुळे स्थानिकांची गैरसोय होत आहे. स्टेशन भागातील गृहनिर्माण संस्थांना पिण्याचे पाणी टँकरद्वारे विकत घ्यावे लागत आहे. संस्थांचे आर्थिक गणित बिघडत आहे. नागरिकांना वेटीस न धरता पुरेशा दाबाने आणि सुरळित पाणीपुरवठा करावा अशी आमची आग्रही मागणी आहे. या भागात जाणीवपूर्वक कृत्रिम पाणीटंचाई केली जात आहे. याबाबत प्रसारमाध्यमांसह आम्ही सातत्याने आवाज उठविला होता. मात्र याकडे कानाडोळा केला जात आहे. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांबाबत गुरुवारी (दि.26) रोजी नगरपरिषदेच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल.

आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, महिलाध्यक्षा दिपाली गराडे यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. महिला शहराध्यक्षा शैलजा काळोखे यांच्यासह राष्ट्रवादीचे काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, स्टेशन भागातील नागरिक या मोर्चात सहभागी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *