Maval News: इंद्रायणी महाविद्यालयाच्या वतीने हर्षदाचे कौतुक

Maval News: इंद्रायणी महाविद्यालयाच्या वतीने हर्षदाचे कौतुक

Pckhabar- तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयाची विद्यार्थिनी हर्षदा शरद गरुड हिने इतिहास रचत जागतिक विजेतेपदाला गवसणी घालत सुवर्णपदक पटकावले. हर्षदाच्या या सुवर्ण कामगिरीचे इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांनी अभिनंदन केले. तसेच पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनीही हर्षदाचे अभिनंदन केले.

एकूण 153 लिफ्टसह वेटलिफ्टर हर्षदा शरद गरुड हिने सोमवारी इतिहास रचला. महिलांच्या 45 किलो वजनी गटात स्पर्धा करताना 16 वर्षांच्या हर्षदाने स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी आठ स्पर्धकांच्या मैदानात एकूण 153 किलो (क्लीन अँड जर्क 83 किलो + स्नॅच 70 किलो) वजन उचलून विजेतेपद पटकावले. स्नॅचमधील 70 किलो प्रयत्नाने हर्षदाला पोडियममध्ये टॉप-ऑफ-द-पॉडियम फिनिश मिळवून दिले, तर क्लीन अँड जर्क विभागात ती दुसऱ्या क्रमांकावर होती.

इंद्रायणी महाविद्यालयात प्रथम वर्ष कला शाखेत शिकणारी हर्षदा प्रथमपासूनच जिद्दी, कष्ट घेऊन ती गोष्ट तडीस नेणारी विद्यार्थिनी आहे. वडिलांचे वेटलिफ्टिंगमधील अपूर्ण राहिलेले स्वप्न कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करायचेच, या जिद्दीने हर्षदा खेळत राहिली. गेल्या तीन महिन्यापासून पतियाळा येथील भारतीय सराव शिबिरात प्रशिक्षण घेत होती. हर्षदाचे वडील ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा विभागात नोकरीस आहेत, तर आई गृहिणी आहे. लहान भाऊ शाळेत शिकत आहे. हर्षदा ही बिहारीलाल दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली वेटलिफ्टिंगचे प्रशिक्षण घेत आहे.

हर्षदा शरद गरुड हिच्या सुवर्ण कामगिरीचे इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे आधारस्तंभ मावळभूषण माजी आमदार कृष्णराव भेगडे, संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांच्यासह पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक यांनी कौतुक करीत अभिनंदन केले.

हर्षदाच्या रोमहर्षक कामगिरीनंतर बोलताना इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे म्हणाले, की हर्षदाने या कामगिरीच्या माध्यमातून इंद्रायणी महाविद्यालयाची पर्यायाने मावळ तालुक्याची मान उंचावली आहे. इंद्रायणी महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी क्रीडा प्रकारात नेहमीच पोषक वातावरण निर्माण करीत आले आहे. भविष्यात हर्षदासारखे अनेक खेळाडू राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकतील, असा विश्वासाही काकडे यांनी व्यक्त केला.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे म्हणाले, की हा इंद्रायणी महाविद्यालयाचा गौरव आहे. देशाची क्रीडा क्षेत्रातली परिस्थिती अत्यंत प्रगतीपथावर आहे, याचे हे द्योतक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *