Pune News: बालविवाह रोखण्यासाठी यंत्रणा सतर्क करण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे निर्देश

Pune News: बालविवाह रोखण्यासाठी यंत्रणा सतर्क करण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे निर्देश

– अक्षयतृतीयेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांकडून विशेष सूचना

Pckhabar- अक्षयतृतीयेच्या पार्श्वभूमीवर बालविवाहाची प्रकरणे रोखण्यासाठी यंत्रणा सतर्क करावी तसेच अशी प्रकरणे लक्षात येताच समुपदेशन करून बालविवाह रोखावेत; प्रसंगी कठोर कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

राज्यासह जिल्ह्यात बालविवाहाच्या घटना रोखण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न करण्यात आले. त्याचा परिणाम म्हणून एप्रिल २०२१ ते एप्रिल २०२२ या कालावधीत राज्यात १ हजार ३३८ आणि पुणे जिल्ह्यात १५ बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले. कोरोना निर्बंध काढण्यात आल्यानंतर राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात विवाह समारंभ होत आहेत. अक्षयतृतीयेला विवाह सोहळे आयोजित करण्यात येतात. या पार्श्वभूमीवर दक्ष राहण्याचे संबंधितांना निर्देश देण्यात आले आहेत.

बाल विवाह आयोजित करणे हा बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ नुसार अजामीनपात्र गुन्हा आहे. कायद्यानुसार या गुन्ह्यासाठी एक लाख रुपये दंड व दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आहे. कायद्याच्या अंमलबजावणीसाठी ग्रामीण भागात ग्रामसेवक आणि शहरी भागात बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी नियुक्त करण्यात आलेले आहे. जिल्ह्यात बालविवाह रोखण्याबाबत सर्व प्रशासकीय यंत्रणांना दक्ष राहून आवश्यक कार्यवाही करण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी स्वतः पुढाकार घेत सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, पोलीस तसेच अन्य यंत्रणांना सूचना दिल्या आहेत.

ग्राम बाल संरक्षण समिती, ग्रामसेवक, सरपंच, पोलिस पाटील, अंगणवाडी सेविका, शिक्षक आदी गावपातळीवरील यंत्रणांनी बालविवाह होऊ नयेत म्हणून प्रतिबंधात्मक कार्यवाही करावी, विवाहासाठी सेवा पुरविणारे यात पुरोहित, बँड पथक, मंगल सेवा केंद्रे, केटरर्स आदींनी विवाहासाठी सेवा पुरविताना बाल विवाह होत नसल्याबाबत खात्री करण्याची निर्देश दिले आहेत. शिवाय नागरिकांनी होणाऱ्या बाल विवाहाविषयी माहिती मिळाल्यास ती पोलिस प्रशासन, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी पुणे कार्यालय अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष तसेच चाईल्ड लाईनला १०९८ वर दूरध्वनी करून तत्काळ माहिती द्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *