Chinchwad News : समर्पित कार्यकर्त्यांच्या बळावरच भव्य प्रकल्प: हेमंत हरहरे

Chinchwad News : समर्पित कार्यकर्त्यांच्या बळावरच भव्य प्रकल्प: हेमंत हरहरे

Pckhabar- “समर्पित कार्यकर्त्यांच्या बळावरच भव्य प्रकल्प उभे राहतात! देशातील असंख्य समाजाभिमुख प्रकल्प कार्यकर्त्यांच्या सातत्य, चिकाटी, धाडस या अंगभूत वैशिष्ट्यांमुळे साकार झाले आहेत. चिंचवडला जागतिक स्तरावर क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या नावाने ओळख देण्याचे कार्य चापेकर स्मारक समितीने केले आहे. सज्जनशक्तीला विवेक अन् सामाजिक बांधिलकीची जोड दिल्यास समाजाचे पुनरुत्थान निश्चित घडेल!” असा आशावाद राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रांत कार्यकारिणी सदस्य हेमंत हरहरे यांनी पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्, चिंचवडगाव येथे गुरुवारी व्यक्त केला.

क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीने सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून हेमंत हरहरे बोलत होते. पद्मश्री गिरीश प्रभुणे, कार्यवाह ॲड. सतीश गोरडे, सहकार्यवाह रवींद्र नामदे, उपाध्यक्ष डॉ. शकुंतला बन्सल, संकल्पनाप्रमुख अशोक पारखी, डॉ. नीता मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती.

गिरीश प्रभुणे यांनी आपल्या मनोगतातून, “अखंड भारतातील सुमारे अडीच हजार क्रांतिकारकांची सूची तयार करण्यात आली असून भारतातील एकमेवाद्वितीय असे क्रांतिकारकांचे संग्रहालय उभारून त्यांच्या कालखंडाचा समग्र इतिहास विविध रूपांतून साकार करण्यात येणार आहे.

याशिवाय महाभारत ते रामजन्मभूमीमुक्ती लढ्यापर्यंतचा इतिहास, वस्तू, चित्र, शिल्प या माध्यमांतून कायमस्वरूपी प्रदर्शित करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने तीन खंडात्मक ग्रंथांमधून लिखित स्वरूपातील इतिहासदेखील प्रकाशित करण्याचा मानस आहे. यासाठी समाजातील सक्षम व्यक्तींच्या क्षमतांचा उपयोग व्हावा!” असे आवाहन केले.

याप्रसंगी सुमारे पन्नास वर्षांपूर्वी कार्यरत असलेल्या चापेकर स्मारक समितीच्या दिवंगत सदस्यांच्या वारसांना स्मृतिचिन्ह, ग्रंथ, शाल प्रदान करून गौरविण्यात आले. प्रभाकर विपट, श्याम उदास, कालिदास आगज्ञान, प्रकाश जाधव, मधुसूदन जोशी, हरी भारती, विजय तारे, गिरीश वैद्य या दिवंगत सदस्यांच्या वारसांनी हा सन्मान स्वीकारला; तसेच आपल्या कृतज्ञतापर मनोगतांतून गतस्मृतींना उजाळा देताना उपस्थितांना सद्गदित केले. भारतमाता, छत्रपती शिवाजीमहाराज, चापेकर बंधू यांच्या प्रतिमांचे पूजन, दीपप्रज्वलन आणि सांघिक पद्य सादर करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.

ॲड. सतीश गोरडे यांनी प्रास्ताविक केले. अशोक पारखी यांनी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त नियोजित उपक्रमांची संकल्पना मांडली. डॉ. नीता मोहिते यांनी चापेकर समितीच्या शिक्षण आणि महिला विभागांची, शाहीर आसाराम कसबे यांनी वाडा विभागाची तसेच डॉ. शकुंतला बन्सल यांनी पुनरुत्थान गुरुकुलम् विषयी उपस्थितांना माहिती दिली. ॲड. अनिल शिंदे यांचा कायदेशीर सल्लागारपदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. मंगला सपकाळ यांनी क्रांतिवीर चापेकरांचे स्तवन आणि शरद जाधव यांनी वैयक्तिक पद्य सादर केले. नितीन बारणे, गतिराम भोईर, नटराज जगताप तसेच चापेकर स्मारक समितीच्या विद्यालयातील शिक्षकांनी संयोजनात परिश्रम घेतले. प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले. कोषाध्यक्ष संजय कुलकर्णी यांनी आभार मानले. सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *