स्वच्छ सर्वेक्षण अभियानात लोणावळा शहराचा देशात तिसरा क्रमांक

स्वच्छ सर्वेक्षण अभियानात लोणावळा शहराचा देशात तिसरा क्रमांक

Pckhabar- स्वच्छ सर्वेक्षण अभियान 2020 मध्ये लोणावळा नगरपरिषदेने देशात तिसरा क्रमांक मिळविला आहे. मागील तीन वर्ष लोणावळा नगरपरिषदेने या स्पर्धेत सहभाग घेत सलग तिन्ही वेळेस राष्ट्रीय नामांकन मिळविले आहे. 20 आँगस्ट रोजी आँनलाईन पद्घतीने या पुरस्काराचे वितरण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या 3898 व 50 हजार ते 1 लाख लोकसंख्या असलेल्या 544 शहरांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. लोणावळा शहराची आजमितीला लोकसंख्या 57 हजार 698 असून बाहेरून फिरायला येणार्‍या पर्यटकांची दैनंदिन सरासरी संख्या 13 हजार 321 इतकी आहे. अतिशय अटितटीच्या या स्पर्धेत लोणावळा नगरपरिषदेने तिसरा क्रमांक मिळविला. यापुर्वी 2018 साली लोणावळा नगरपरिषद स‍ातव्या व 2019 साली दुसर्‍या क्रमांकावर होती.

स्वच्छ सर्वेक्षण 2020 अंतर्गत लोणावळा नगरपरिषदेने 163 कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये शहरातील विविध सामाजिक संघटना, शाळा, महाविद्यालये, संस्थांमधील पुरुष, महिला व मुले मिळून 18 हजार 302 जणांनी सहभाग नोंदविला होता. शौचालय सुविधेच्या बाबतीन 2019 साली लोणावळा नगरपरिषदेला ODF+ व 2020 साली ODF++ दर्जा मिळाला आहे. शहरात 40 सार्वजनिक शौचायले असून यापैकी 10 शौचालयांना स्टार दर्जा प्राप्त आहे. या व्यतिरिक्त 524 शौचालयांसाठी अनुदान देण्यात आले होते. 

घरोघरचा कचरा गोळा करण्यासाठी नगरपरिषदेने जिपीएस प्रणालीद्वारे वाहनांचे नियोजन केले आहे. 2019 व 2020 या दोन वर्षात शहराला कचरामुक्त शहरचा 3 स्टार सिटी दर्जा मिळाला आहे. नागरिकांच्या कचर्‍या बाबतच्या तक्रारींची सोडवणूक करण्यासाठी हेल्पलाईन नंबर व अँप्लिकेशनच्या माध्यमातून प्रयत्न करत 95.37 टक्के तक्रारींची सोडवणूक केली आहे. 

लोणावळा शहराला कचरामुक्त व स्वच्छ बनविण्यासाठी शहरातील शाळा, महाविद्यालये, सामाजिक संघटना, पत्रकार संघ, नागरिक, हाॅटेल, बचतगट, महिला मंडळे यांनी सहभाग घेतला होता. नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, तत्कालिन मुख्याधिकारी सचिन पवार यांनी शहरवासीयांना आवाहन करत पथनाट्ये सादर केली. कापडी पिशव्या तसेच 15 हजार डस्टबीनचे नागरिकांना वाटप केले. शाळांमध्ये पासबुक योजना, रिक्षांमध्ये डस्टबीन बसविले, उघड्यावर कचरा टाकणार्‍यांवर दंडात्मक कारवाई, स्वच्छता मॅरेथॉन, घरगुती पद्घतीने कचर्‍यापासून खत निर्मिती असे विविध उपक्रम राबविले.

यावर्षी लोणावळा शहराला देश पातळीवर पहिल्या क्रमांकाचे स्वच्छ शहर बनविण्यासाठी शहरातील सर्व नागरिकांनी तसेच पर्यटकांनी मी लोणावळेकर म्हणून नगरपरिषदेला सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, नवनियुक्त मुख्याधिकारी रवि पवार यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *