Pimpri News: “अभिवाचनातून नवसर्जनाची ऊर्मी!” – पद्मश्री गिरीश प्रभुणे

Pckhabar- “साहित्यिकांना अभिवाचनातून नवसर्जनाची ऊर्मी लाभते! एकेकाळी मराठी साहित्यात लोकप्रिय असलेली ही कला काहीशी दुर्लक्षित झालेली होती. ‘रुद्रंग’च्या माध्यमातून ती पुनरुज्जीवित होते आहे, याचा आनंद वाटतो!” असे गौरवोद्गार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि साहित्यिक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी कॅप्टन कदम सभागृह, निगडी प्राधिकरण येथे रविवार, दिनांक १७ एप्रिल २०२२ रोजी प्रमुख पाहुणे म्हणून मनोगत व्यक्त करताना काढले. ज्येष्ठ साहित्यिक पुरुषोत्तम सदाफुले, रुद्रंग (पुणे) या संस्थेचे अध्यक्ष रमेश वाकनीस यांची प्रमुख उपस्थिती होती.
‘लागले खूळ कलावंताला…’ या अभिनव उपक्रमांतर्गत मराठीतील प्रथितयश साहित्यिकांच्या विविध साहित्यकृतींचे अभिवाचन रमेश वाकनीस, अशोक अडावदकर, किशोरी सरीन, माधुरी ओक, उज्ज्वला केळकर, नागेश जोशी, नेहा कुलकर्णी, सागर यादव, अरुणा वाकनीस या अभिवाचक कलावंतांनी केले. ज्येष्ठ एकपात्री कलाकार नंदकुमार कांबळे यांच्या गायक, अभिनेते यांच्या आवाजातील नकलांची जोड या उपक्रमाला लाभली. पिंपरी-चिंचवड शहरातील प्रा. तुकाराम पाटील, राज अहेरराव, सुरेश कंक, सुहास घुमरे, मधुरा कुलकर्णी, मानसी चिटणीस, अभिजित काळे यांच्या कथा, कविता, ललितलेखनाचा संपादित आविष्कारदेखील या उपक्रमात घडविण्यात आला.
“शारदा सरस्वती शुभदा…” या सरस्वतीस्तवनाला प्रचिती शिरवले या विद्यार्थिनीने संवादिनीवर आणि राजेंद्र पुराणिक यांनी तबल्यावर सुरेल साथसंगत केली. ‘माझा लई जीव हाय या बाईवर…’ या अभिवाचनातून मराठी भाषेतील शब्दवैविध्याने, माधुर्याने रसिक हरखून गेले. डॉ. यशवंत पाठक यांच्या ‘झांजेतील चंद्र’ या कादंबरीचा अंश पार्श्वसंगीताच्या सुरावटीवर अन् वाचिक अभिनयाच्या प्रगल्भ आविष्कारातून अधिकाधिक खुलत गेला; तर ‘पैशाचं झाड’ या बालकवितेने श्रोत्यांना वय विसरायला भाग पाडले. ‘ठोंबरे’ या कवितेतून झालेल्या बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्या अतितरल भावविश्वाच्या दर्शनाने उपस्थितांना अंतर्मुख केले.

‘स्मृतिचित्रे’ या लक्ष्मीबाई टिळक यांच्या पहिल्या स्त्री आत्मचरित्रावरील एकपात्री आविष्काराने गतकाळ जिवंत केला. कवी हेमंत गोविंद जोगळेकर यांची ‘मातृभोजन’ , अनुपमा उजगरे यांची ‘अवस वाढ गं माई’ या कवितांचे उत्कट अभिवाचन, ‘काव्यचिंतन’ या ललितलेखातील तरल भाववृत्ती आणि विनोद गोरवाडकर लिखित ‘पोटभर बोलणाऱ्या माणसाची गोष्ट’ या कथेतील माणसाची व्यक्त होण्याची भूक, महाभारतातील द्रौपदी आणि द्रोण यांच्या अस्वस्थ मनांचा उद्रेक तसेच विडंबन गीतातून राजकीय स्थितीवर ओढलेले कोरडे रसिकांना भावल्याने त्यांच्या टाळ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
‘अंघोळ’ या कथेतून मित्रप्रेमाची अनुभूती मिळाली; तर शंकर पाटील यांच्या ‘रामायणाचं महाभारत’ या विनोदी कथेने श्रोत्यांची हसता हसता पुरेवाट झाली. “गर्द सभोती रान रान साजणी…” या नाट्यगीताचे अप्रतिम सादरीकरण, ‘तंत्र’ या कवितेतून आधुनिक जगातील जगण्याचे बदलेले तंत्र, ‘शून्य’ या कवितेतून मानवी जीवनाचा वैय्यार्थ, ‘लोंढे येत आहेत…’ या कवितेच्या सादरीकरणातील सामूहिक प्रतिध्वनींनी अंगावर शहारे आणले; तर ‘राधा’ या संकल्पनेच्या दोन भिन्न कवितांचे फ्युजन समारोपाला वेगळा आयाम प्राप्त करून दिला. एकूणच कवितांच्या सादरीकरणातील प्रयोगशीलता संस्मरणीय होती. समारोप प्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत चौगुले यांनी, “अभिवाचनाच्या माध्यमातून साहित्यातील नवरसांची मेजवानी मिळाली!” असे मत व्यक्त केले. काव्यशास्त्रविनोदाचा परिपोष करणारे निवेदन ही कार्यक्रमाची जमेची बाजू होती. नंदकुमार मुरडे, अनिकेत गुहे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.










Leave a Reply