Sanghavi News: महापुरुषांच्या विचारांमधून प्रेरणा घेऊन तरुणाईने मार्गक्रमण करावे : प्रा. नितीन बानगुडे पाटील 

Sanghavi News: महापुरुषांच्या विचारांमधून प्रेरणा घेऊन तरुणाईने मार्गक्रमण करावे : प्रा. नितीन बानगुडे पाटील

Pckhabar- छत्रपती शिवाजी महाराज यांनी पर स्त्री मातेसमान ही शिकवण देऊन स्त्री सन्मान केला, महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षण, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून स्त्री अधिकार व दलितांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. त्यामुळे महापुरुषांच्या विचारांमधून प्रेरणा घेऊन तरुणाईने मार्गक्रमण करण्याचे आवाहन व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी केले.

सांगवी येथील सांगवी विकास मंचचा सातवा वर्धापनदिन आणि छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘जागर शिव – भीम विचाराचा’ या विषयावर प्रा. नितीन बानगुडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रा. बानगुडे बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, चेतन शिंदे, सांगवी विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष महेश भागवत, सामाजिक कार्यकर्त्या नीलिमा भागवत, कार्याध्यक्ष ओंकार भागवत, विजय साने, आनंदा कुदळे, सोमनाथ शेळके, प्रताप गुरव, नारायण भागवत, चैतन्य नेवे आदी उपस्थित होते.

प्रा. बानगुडे पाटील पुढे बोलताना म्हणाले, की आजच्या तरुणाईने महापुरुषांमधील क्षमता, सामर्थ्य या गोष्टी अंगिकारल्या पाहिजेत. तसेच स्वतः ची क्षमता ओळखून जागृत राहावे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जात, धर्म, भाषा, प्रांत हे भेद विसरून एकत्र येण्याची भावना रयतेच्या मनात रुजवली. हाच वारसा भारताला महासत्तेकडे घेऊन जाऊ शकतो.

जगातील पहिला सर्जिकल स्ट्राईक, अनुकंपा तत्वावर नोकरी, विधवांना फॅमिली पेन्शन, संकटग्रस्त कुटुंबाना अडीच शेरी योजना, पाणी आडवा पाणी जिरवा योजना अशा विविध योजना शिवाजी महाराजांनी राबविल्या होत्या. महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षण, दत्तक मूल, गुलामगिरीविरुद्ध आवाज उठवला. तर वर्णव्यवस्थेला विरोध, दलितांना शिक्षण देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गावकुसाबाहेरील दलित समाजाला मुख्य प्रवाहात आणून त्यांचा उत्कर्ष केला.

विशेष म्हणजे या तीनही महापुरुषांनी राजकीय व सामाजिक लोकशाही दिली. समाजाचा विकास हेच या महापुरुषांचे मुख्य सूत्र होते. अन्याय, अत्याचार करणाऱ्यांना त्यांनी कृतीतून जशास तसे उत्तर दिले. त्यामुळे महापुरुषांनी सांगितलेले प्रज्ञा, शील, करुणा, शिक्षण हे गुण अंगीकरून त्यांचे विचार अमलात आणून समाज परिवर्तनासाठी कष्ट घेणे आवश्यक आहे. सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊनच समाजविकास साधता येतो, हेच या महापुरुषांच्या कृतीतून स्पष्ट दिसते. समाजहितासाठी त्यांच्या विचारांचा अवलंब करण्याची आवश्यकता असल्याचेही प्रा. बानगुडे यांनी सांगितले.

खासदार बारणे यांनी भागवत कुटुंबीयांनी कोरोना कालावधीत समाजासाठी केलेल्या कार्याचा गौरव केला. तसेच सामाजिक क्षेत्रात चांगले काम करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, सांगवी विकास मंचने केलेल्या कार्याची दखल घेत खासदार श्रीरंग बारणे व प्रा. बानगुडे पाटील यांच्या हस्ते नीलिमा भागवत व महेश भागवत यांचा सत्कार करून गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओंकार भागवत यांनी, तर सूत्रसंचालन नामदेव तळपे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *