Pimpri news : जाणिवांचा मोहर म्हणजे काव्य :  रमण रणदिवे

Pimpri news : जाणिवांचा मोहर म्हणजे काव्य :  रमण रणदिवे

Pckhabar-  “मानवी रक्ताला आलेला जाणिवांचा मोहर म्हणजे काव्य होय!” असे विचार ज्येष्ठ गझलकार रमण रणदिवे यांनी सफायर पार्क सभागृह, वाकड येथे रविवारी व्यक्त केले.

गझलपुष्पनिर्मित आणि गझलकारा मीना शिंदे लिखित ‘दीवान-ए-मीना’ या दीवान प्रकारातील गझलसंग्रहाचे प्रकाशन करताना रमण रणदिवे बोलत होते.

साहिब-ए-दीवान शायर डॉ. संदीप गुप्ते (मुंबई), गझलपुष्पचे अध्यक्ष रघुनाथ पाटील, संजय शिंदे यांची विचारपीठावर प्रमुख उपस्थिती होती; तसेच रसिकांमध्ये कुलवंतवाणी समाजातील संपूर्ण महाराष्ट्रातील मान्यवर, साहित्यिक,  सामाजिक, प्रशासकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि मीना शिंदे यांचे नातेवाईक उपस्थित होते.

डॉ. संदीप गुप्ते म्हणाले की, “मराठी गझलेत दीवान ही परिपूर्णतेची संकल्पना रुजावी, अशी अपेक्षा होती. सुरेश भट यांच्या जयंतीचे औचित्य साधून मीना शिंदे यांचा संपूर्ण गझलविश्वातील महिला गझलकाराचा पहिला दीवान प्रकाशित होत आहे, ही ऐतिहासिक बाब आहे. उपजत प्रतिभेला सातत्यपूर्ण साहित्यसाधनेची जोड लागते. त्यांचे गझललेखन ही इलाही जमादार यांना गुरुवंदना आहे. केवळ एका दमदार शेरामुळे गझलकार अजरामर होऊन जातो. ‘दीवान-ए-मीना’ या संग्रहात विविध दर्जेदार शेर आढळून येतात!” मीना शिंदे यांनी आपल्या जीवनप्रवासात अन् लेखनातील वाटचालीत प्रेरणा देणाऱ्या सर्वांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करून “माझी गझल म्हणजे आयुष्यातील सुख-दु:खाच्या संगमाची अनुभूती आहे!” अशा भावना व्यक्त केल्या.

‘दीवान-ए-मीना’ या गझलसंग्रहाच्या प्रकाशनपूर्व विक्री झालेल्या रुपये सोळा हजारांच्या निधीचा धनादेश हृदयविकारग्रस्त बालकांच्या उपचारांसाठी दुर्गाई हृदय प्रतिष्ठान या संस्थेला सुपुर्द करण्यात आला. विदेशातील अमेरिका, सिंगापूर, दुबई आणि भारतातील हैद्राबाद सह विविध शहरांमध्ये फेसबुक लाईव्ह तंत्राच्या साहाय्याने या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. प्रकाशन सोहळ्यापूर्वी मीना शिंदे यांच्या निवडक गझलांचे ज्योत्स्ना चांदगुडे (“सदा रहा तू हसून मीना…”), सरोज चौधरी (“गझलविधेचा स्वीकार करते…”), माधुरी गयावळ (“आयुष्य सोसताना भोगून खूप झाले…”), सारिका माकोडे (“घ्यावी म्हणते मीही थोडी…”), समृद्धी सुर्वे (“रक्तात तुझ्या साखर निघते…”), स्वाती ठकार (“कातरवेळी कातर कातर स्वर माझा…”) यांनी प्रभावी अभिवाचन केले. रमण रणदिवे पुढे म्हणाले की, “मराठी प्रतिमा अन् प्रतीके वापरून सुरेश भटांनी मराठी गझल खऱ्या अर्थाने समृद्ध केली. मीना शिंदे यांनी आपल्या गझलांमधून विविध विषयांना स्पर्श केला आहे. ‘दीवान-ए-मीना’मधील प्रत्येक गझल काहीतरी संदेश देऊन जाते. गझलेच्या शेरांमधून जीवनानुभव वाहत असतो. कोणत्याही साहित्यप्रकारामागे कवितेचा मूलस्त्रोत असतो म्हणून कवितालेखन ही मोठी जोखीम असते; कारण समग्र जीवनदर्शन काव्यातून होते!” सरस्वती आणि कविवर्य सुरेश भट यांच्या प्रतिमांचे पूजन तसेच दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.

प्रशांत पोरे यांनी प्रास्ताविक केले. संकल्प शिंदे, अमित औटी, सांगाती शिंदे, निकिता शिंदे, मनीषा पवार, महेश सोनवणे, राजेंद्र शिंदे, माधव सोनवणे आणि गझलपुष्पचे पदाधिकारी यांनी कार्यक्रमाच्या संयोजनात परिश्रम घेतले. दिनेश भोसले यांनी सूत्रसंचालन केले. संजय शिंदे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *