Talegaon Dabhade News: डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीचा भारत एकच: डॉ. श्रीपाल सबनीस

Pckhabar- आजही आपल्याकडे सवर्ण, दलित, अल्पसंख्याक समुदायांचे महासंघ अस्तिवात आहेत. अशा जातीयवादी शक्ती प्रबळ होणे, हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाचा पराभव आहे, असे मत ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व जेष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या इंद्रायणी महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्तपणे आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती कार्यक्रमात प्रमुख पाहुणे ते म्हणून बोलत होते. सुप्रसिद्ध कवी उद्धव कानडे, प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, प्रा. राजेंद्र आठवले आदी यावेळी उपस्थित होते.
डॉ. श्रीपाल सबनीस पुढे बोलताना म्हणाले, की भारताचे सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय भवितव्य संविधानाने उज्ज्वल केलेले आहे. मुसदा समितीचे अध्यक्ष म्हणून काम करताना भारतीय राज्यघटनेला कोणत्याही जातीधर्माचा टिळा बाबासाहेबांनी लावला नाही, हे महत्त्वाचे आहे. संविधानाची संस्कृती ही माणसाचे माणूसपण अधोरेखित करणारी आहे.
आजच्या बदललेल्या समाजवास्तवाबद्दल चिंता व्यक्त करताना सबनीस म्हणाले, की संविधानाला धार्मिक रंग देता येत नाही आणि माणूस म्हणून आपल्याला निधर्मी होता येत नाही. अशा दुफळीत अडकलेल्या समाजमनाला शाश्वत सत्याशी सुसंगतपणे सांधून ठेवणारा महत्त्वाचा स्रोत म्हणजे संविधान आहे. उपेक्षित आणि दलितांसाठी काम करताना त्यांच्या समस्यांवर त्यांनी मूलभूत स्वरूपाचे चिंतन केले आणि सोबतच प्रस्थापित हिंदू मानसिकतेवरील जातीवादाची जळमटे झटकण्याचे काम डॉ. बाबासाहेबांनी केले. त्यामुळे या महामानवाला अनेक चौकटीत किंवा वादामध्ये अडकवणाऱ्या, तसेच त्यांची गांधी विरोधक ही प्रतिमा तयार करणाऱ्या तथाकथित दुकानदारानो आता तरी आपण बाबासाहेबांमधला महापुरुष समजून घेणार आहोंत का? असा आर्त सवालही यावेळी सबनीस यांनी केला. विश्वात्वक शांतातेला जन्म घालणारा नवा समाज संविधानाच्या साहाय्याने निर्माण करण्याची जबाबदारी आपली आहे आणि ती प्रत्येकाने सामर्थपणे पार पाडावी, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

आपल्या अध्यक्षीय भाषणात उद्धव कानडे म्हणाले, की बाबासाहेबांच्या स्वप्नातील माणूस निर्माण करणे अवघड आहे. सत्याचा शोध घेणारा आणि माणूसपणाचा चेहेरा देणारा धम्म त्यांनी संविधानाच्या रुपात आपल्याला सोपविला हे त्यांचे कार्य कालातीत आहे.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी केले. यावेळी त्यांनी डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या वाङ्मयीन कार्याचा परिचय करून देत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महान कार्याचा आढावा घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा.राजेंद्र आठवले यांनी केले.










Leave a Reply