Pimpri News: भगवान महावीर, महात्मा फुले , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अव्दितीय कर्तृत्वाला अभिवादन- डॉ. अशोककुमार पगारिया

Pimpri News: भगवान महावीर, महात्मा फुले , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अव्दितीय कर्तृत्वाला अभिवादन- डॉ. अशोककुमार पगारिया

Pckhabar- आचार विचार आणि संस्कृतीच्या परिघातून समाजजीवनाची स्थिती – गती बदलते. विचार हा त्या काळाचा साक्षीदार असतो. कर्मकांडातून समाजाला बाहेर काढण्यासाठी विरक्ती, सामंजस्य, प्रेमभाव या सदविचारातून प्रेरित होऊन अहिंसा विचार सामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम चोवीसावे तीर्थंकार भगवान महावीर यांनी केले. तो वसा आणि वारसा जोपासण्याचे काम तरुणांनी करावे असे प्रतिपादन डॉ. अशोककुमार पगारिया यांनी केले.

भगवान महावीर, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या जयंतीच्या निमित्ताने या महामानवांना अभिवादन करण्यासाठी भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीच्या प्रीतम प्रकाश महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी बोलताना डॉ. अशोककुमार पगारिया म्हणाले की; भगवान महावीरांची अहिंसा, महात्मा फुले यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतीय संविधानातील योगदान महत्त्वाचे आहे.

एकूणच त्या त्या काळाची सामाजिक मानसिकता विचारात घेतली तर भगवान महावीरांच्या काळामध्ये कर्मकांड नवस-सायास पूर्ण करण्यासाठी प्राण्यांची हिंसा केली जात असे या कर्मकांडातून समाजाला बाहेर काढण्यासाठी भगवान महावीरांनी विरक्ती, सामंजस्य, प्रेमभाव या मूल्याची समाजामध्ये प्रेरणी करून सामान्य माणसाची मानसिकता बदलविण्याचे काम केले. भगवान महावीर यांचा विचार पुढे महात्मा फुले यांनी शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून रुजवला तर शिक्षण क्षेत्रातील विचाराला भारतीय संविधानाचे मूर्त स्वरूप देण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही रुजविण्याचे फार मोठे काम केले या महामानवांचे विचार तरुणांनी आत्मसात करून पुढील भविष्याची वाटचाल करावी असे मत त्यांनी व्यक्त केले.

सदर कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थी कल्याण मंडळाच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.सचिन पवार, प्रशासकीय अधिकारी प्रा. भास्कर पांडुरंग, परीक्षा विभाग प्रमुख डॉ.विजय निकम, राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा. सुधाकर बैसाणे, डॉ. हनुमंत शिंदे, प्रा.प्रवीण मस्के, प्रा.उमेश लांडगे, डॉ.स्वाती वाघ, प्रा.विभा ब्राह्मणकर, प्रा.महालक्ष्मी शिरसाठ ,प्रा. रूपाली आगळे, प्रा.प्रशांत रोकडे, ग्रंथपाल राजेश कुंभार, सारिका बेलदोर यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक विद्यार्थी कल्याण मंडळाचे प्रमुख प्रा. सचिन पवार केले तर प्रशासकीय अधिकारी प्रा. भास्कर पांडुरंग यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *