Pimpri News: पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने म.ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विचार प्रबोधन

Pckhabar- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या विचार प्रबोधन पर्वास उद्या सोमवारी सकाळी साडेसहापासून सुरुवात होणार आहे. पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या शेजारील मैदानात दि. ११ एप्रिल ते १५ एप्रिल या कालावधीत विविध सांस्कृतिक प्रबोधनात्मक कार्यक्रम, चर्चासत्र, परिसंवाद, शाहिरी जलसे, प्रबोधन कार्यक्रम संपन्न होणार आहेत.
नागरिकांनी या प्रबोधन पर्वाचे उद्घाटन सकाळी सव्वा दहा वाजता आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या हस्ते होईल. सोमवार दि. ११ एप्रिल रोजी महात्मा फुले जयंतीदिनी विचार प्रबोधनपर्वास सुरुवात होणार आहे. सकाळी ६.३० वाजता महापालिका कर्मचारी वृंदांकडून“भीमज्योती पहाट” कार्यक्रमाद्वारे महामानवांना संगीतमय अभिवादन करण्यात येणार आहे. सकाळी ८.३० वाजता स्थानिक कलाकारांचा कार्यक्रम होईल. सकाळी १० वाजता महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत महात्मा फुले यांच्या प्रतिमेस आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येईल.

पिंपरी येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास सही आयुक्त पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. यानंतर प्रबोधन पर्वाचे उद्घाटन होणार आहे. तदनंतर सकाळी १०.३० वाजता शेखर गायकवाड यांच्या गीत गायनाचा कार्यक्रम होईल. तसेच दुपारी १२ वाजता सुनिल गायकवाड आणि सहका-यांचा प्रबोधनपर गीत गायनाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच दुपारी १.३० वाजता गीत गायन सादरकर्ते विनोद फुलमाळी यांचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी ३ वाजता सिध्दार्थ भोसले यांचा ‘भटक्या विमुक्तांचा जयभीम एल्गार’हा संगीतमय कार्यक्रम होणार आहे.
सायंकाळी ४.३० वाजता ‘माध्यमांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि भारतीय संविधान’ या विषयावर परिसंवाद होणार असून यामध्ये प्रसिद्ध कवी भाष्यकार तसेच चित्रपट निर्माते रामदास फुटाणे, अभिनेते किरण माने, कवी तथा अभिनेते सौमित्र उर्फ किशोर कदम, साहित्यिक प्रा. डॉ. सुभाष वाघमारे सहभागी होणार आहेत. सायंकाळी ६.३० वाजता ख्यातनाम गायक मुकुंद ओव्हाळ यांचा प्रबोधनात्मक गीतांचा कार्यक्रम होणार आहे. रात्री ८ वाजता पैस रंगमंच प्रस्तुत‘क्रांतिसूर्य ते महासूर्य – एका संगराचा प्रवास’ हा नाट्यमय सांगितीक अभिवादनाचा कार्यक्रम होईल.
दरम्यान, दि. ११ एप्रिल ते १५ एप्रिल दरम्यान पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे महापालिका आणि बानाई संघटनेच्या संयुक्त विद्यमाने बेरोजगार युवक युवतींसाठी स्वयंरोजगार व उद्योजकता प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले असून १५ एप्रिल रोजी रोजगार मेळावा घेण्यात येणार आहे.










Leave a Reply