Pimpri News: पिंपरी चिंचवड स्कील डेव्हलपमेंट सेंटरद्वारे विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासावर भर देण्याचा प्रयत्न

Pimpri News: पिंपरी चिंचवड स्कील डेव्हलपमेंट सेंटरद्वारे विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासावर भर देण्याचा प्रयत्न

स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण यांचे प्रतिपादन

Pckhabar- पिंपरी चिंचवड महापालिका व स्मार्ट सिटीमार्फत स्कील डेव्हलपमेंट, इन्क्युबेशन सेंटर आणि एम्प्लॉयमेंट सारखे उपक्रम राबविले जात आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने या उपक्रमांतर्गत ४२ कोर्सेस तयार करण्यात आले असून याद्वारे पिंपरी चिंचवड शहरातील विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासावर भर देण्यात येत आहे, असे प्रतिपादन स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि बाबुरावजी घोलप महाविद्यालय, सांगवी यांच्या मॉडर्न स्कील सेंटर, विद्यार्थी विकास मंडळ व वाणिज्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि. ०७ एप्रिल रोजी “रोजगार कौशल्य योजना” या विषयावर कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यक्रमाच्या उदघाटनप्रसंगी श्री. पोमण बोलत होते. प्रसंगी, व्यासपीठावर प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, उद्योजकता विकास महाराष्ट्र केंद्राचे विभागीय अधिकारी (कोकण) सुरेश उमाप, उद्योजिका प्राजक्ता जोशी, उद्योग संसदचे संस्थापक अध्यक्ष सरोदे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. विजय घाडगे, कार्यक्रम समन्वयक डॉ. नरसिंग गिरी आदी उपस्थित होते. नव उद्योजकांसाठी असणाऱ्या शासकीय योजना व अनुदान, उद्योगात रोजगाराच्या संधी 4.0, स्वत:चे मालक व्हा…! या विषयांवर मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

श्री. पोमण पुढे म्हणाले, सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी आपल्यातील न्यूनगंड बाजूला ठेवावा. प्रत्येकवेळी दुस-याचा विचार करणे टाळून यशाचे शिखर गाठणे शिकायला हवे. बुध्दीला चालणा देवून जे मेहनतीने मिळते ते निरंतर टिकते, हे लक्षात घ्यावे. भारतीय बुध्दीमत्तेला वाव असून जगाची गरज ओळखा, असा सल्लाही त्यांनी दिला. औद्योगीक क्षेत्रासाठी आवश्यक असणा-या कौशल्य विकासासाठी पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी विविध उपक्रम राबवित आहे. इन्कयुबेशन सेंटरच्या माध्यमातून दरवर्षी २५ इन्क्युबेटर्सचा सहभाग नोंदविला जात आहे.

स्कील डेव्हलपमेंटच्या माध्यमातून कोर्सेस सूरू करण्यात आलेले आहेत. रोबोटिक पध्दतीने मुलाखत तंत्र विकसीत करण्यात येत आहे, अशा विविध योजनांची माहिती देखील त्यांनी दिली. सदर उपक्रम कौशल्य विकासासाठी फायदेशीर ठरणारे असून शहरातील विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने या योजनांचा लाभ घ्यावा. तसेच, पिंपरी चिंचवड शहराने “स्वच्छ सर्वेक्षण २०२२” या उपक्रमात सहभाग नोंदविला आहे. शहराचा देशात प्रथम क्रमांक येण्यासाठी स्वच्छ सर्वेक्षण लिंकद्वारे फिडबॅक नोंदवून या मोहिमेत सहभागी व्हा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *