Pimpri News : पिंपरी-चिंचवड शहरात घर खरेदी करणे सर्व सामान्यांच्या आवाक्याबाहेर!
मुद्रांक शुल्क व रेडीरेकनरच्या दरात वाढ

Pckhabar- इंधन दरवाढीमुळे महागाईत होरपळत असताना आता सर्वसामान्यांना घरे घेणेही मुश्कील झाले आहे. मेट्रो रेल्वेसाठी मुद्रांक शुल्कात १ टक्का वाढ करण्यासोबतच पिंपरी चिंचवडच्या रेडीरेकनर (वार्षिक मूल्यदर तक्ता) दरातही सरासरी १२.३६ टक्के वाढ करण्यात आली आहे. नवे दर १ एप्रिलपासून लागू झाल्याने घर खरेदी करणे अधिकच महाग झाले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही मालमत्ता हस्तांतरण शुल्क अर्धा टक्के केल्याने घरे घेणारे बेजार झाले आहेत.

कोरोनामुळे आर्थिक संकट उभे राहिले असताना राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने यंदा राज्यात रेडीरेकनर दरात सरासरी पाच टक्के वाढ केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून रेडीरेकनरच्या दरात वाढ झाली नव्हती. कोरोनामुळे दर वाढविले नसल्याचे राज्य शासनाकडून स्पष्ट केले होते. दरम्यानच्या वर्षात रिअल इस्टेट क्षेत्रात मंदी आली होती. रेडीरेकनरचे दर जास्त असल्याने लोकांचा कल मालमत्ता खरेदीकडे कमी होता. त्यामुळे दर न बाढविण्याची मागणी बांधकाम व्यावसायिकांकडून केली होती. गेल्या वर्षी मुद्रांक शुल्क निम्म्यावर आणले होते. त्यामुळे खरेदी- विक्री व्यवहारात तेजी आली होती. मुद्रांक शुल्कातून राज्य शासनाला मोठा महसूल मिळतो.
कोरोनामुळे सरकारच्या उत्पन्नावर परिणाम झाला. त्यामुळे यंदा रेडीरेकनरच्या दरात वाढ केली आहे. मालमत्तांचे शासकीय दर निश्चित करण्यासाठी रेडीरेकनरचा आधार घेण्यात येतो. या आधारेच मुद्रांक शुल्क आकारले जाते.
राज्यात महापालिका क्षेत्रात सरासरी ८.८० टक्के वाढ करतानाच ग्रामीण भागात सरासरी ६.९६ टक्के आणि शहरालगतच्या नव्याने विकसित होणाऱ्या परिसरात (प्रभाव क्षेत्र) ३.९० टक्के दरवाढ करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात सरासरी ८.१५ टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यामध्ये पुण्याच्या मूळ हद्दीत ६.१२ टक्के, तर २३ समाविष्ट गावांमध्ये १०.१५ टक्के बाढ करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत १२.३६ टक्के वाढ करण्यात आली ‘घरघर’ लागली आहे.
मुद्रांक शुल्कात १ टक्का वाढ झाल्याने आता शहरी भागात रजिस्ट्रीवर ७ टक्के मुद्रांक शुल्क आकारण्यात येईल. मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू असलेल्या पुणे, पिंपरी चिंचवड क्षेत्रात एक टक्का मेट्रो अधिभार लागू करण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना एक टक्का जास्त मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे.
पेट्रोल, डिझेलसह जीवनावश्यक वस्तूही महाग झाल्या आहे. सामान्य नागरिकांचे आर्थिक कंबरडेच मोडले आहे. त्यातच आता मुद्रांक शुल्कासोबत रेडीरेकनरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. नवे दर १ एप्रिलपासून लागू झाले असून, मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार महागले आहेत. घरे आणि जमिनीच्या किमती आवाक्याबाहेर गेल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या स्वप्नांतील घरांना ‘घरघर’ लागली आहे.










Leave a Reply