Dehugaon News : दृष्टीहीन संतोष दिलीप भसे यांचे IBPS PO EXAM मध्ये ‘नेत्रदीपक’यश

Dehugaon News : दृष्टीहीन संतोष दिलीप भसे यांचे IBPS PO EXAM मध्ये ‘नेत्रदीपक’यश

संकटांना न डगमगता ध्येयाच्या दिशेने मार्गक्रमण करणाऱ्या संतोष भसे यांचा प्रवास प्रेरणादायी : प्रा. विकास कंद

Pckhabar- असाध्य ते साध्य करीत सायास… कारणे अभ्यास तुका म्हणे …. या श्री संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाप्रमाणे सांगुर्डी गावातील आदर्श व्यक्तिमत्व, संतोष दिलीप भसे यांनी IBPS PO EXAM मध्ये भरघोस यश मिळवत युनियन बँक ऑफ इंडियामध्ये क्लासवन अधिकारी प्रोबशनरी ऑफिसर म्हणून उज्ज्वल यश संपादन केले. याबद्दल अभंग प्रतिष्ठान आणि सृजन फाऊंडेशनच्या वतीने अभिनंदन करून सन्मान करण्यात आला.

संतोषदादाचा हा प्रवास निश्चितपणे सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. त्यांच्याशी संवाद साधताना त्यांच्या मनातील जिद्द, स्वप्न सत्यात आणण्यासाठी असणारी त्यांची तळमळ कौतुकास्पद होती. नियतीने जरी आपली दृष्टी हिरावून घेतली तरी जगण्यातला सकारात्मक दृष्टिकोन मात्र संतोष दादाने सदैव जीवंत ठेवला आहे. त्यांच्या सर्व परिवाराने संतोषदादाच्या उज्वल भविष्यासाठी घेतलेले परिश्रम कौतुकास्पद आहे.

याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना प्राध्यापक विकास कंद यांनी ध्येयवादी जीवनप्रवासाचे कौतुक करीत आपल्या दृष्टिहीनतेवर मात करीत अमेरिकेतील सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार ज्यांनी आपल्या जीवनामध्ये मिळवला व सर्व जगापुढे एक आदर्श ठेवला अशा हेलन केलर यांचा सुंदर दाखला दिला, हेलन केलर यांना एका मुलाखतीत विचारण्यात आले जीवनात दृष्टिहीनतेपेक्षा मोठे दुर्भाग्य कोणते. त्यावेळी त्या म्हणतात, जीवनात डोळे व दृष्टी असुनही मोठे स्वप्न न पाहणे हे सर्वात मोठे दुर्भाग्य आहे. संतोषदादाने पाहिलेले स्वप्न आपल्या जीवनातून, आपल्या जिद्दीच्या, अभ्यासाच्या बळावर सत्यात साकार केले आहे… म्हणूनच प्रत्येकाने मोठे स्वप्न पाहून सत्यात आणण्यासाठी मनापासून धडपड केली पाहिजे कितीही संकटे आली तरी देखील खचून न जाता ध्येयाच्या दिशेने पाऊल टाकत राहिले हीच संतोष दादाच्या जीवनातून सर्वांना आज शिकायला मिळाले आहे,अशा भावना व्यक्त केल्या.

याप्रसंगी अभंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर मोरे, माजी उपसरपंच सचिन कुंभार, उद्योजक दिनेश कुंभार, सुनील भसे‌‌, उद्योजक राजेंद्र भसे, सृजन फाऊंडेशनचे सचिव, प्रा. विकास कंद उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *