Maharashtra News : ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शाॅप किपर्स फेडरेशनच्या हंगामी अध्यक्षपदी गणपत डोळसे पाटलांची निवड

Maharashtra News : ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शाॅप किपर्स फेडरेशनच्या हंगामी अध्यक्षपदी गणपत डोळसे पाटलांची निवड

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांकडून अध्यक्षांचे अभिनंदन

कार्यकारणीबाबतचा निर्णय लवकरच – विजय गुप्ता

Pckhabar- ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शाॅप किपर्स फेडरेशनच्या हंगामी अध्यक्षपदी गणपत डोळसे पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यात नुकतीच पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

सर्वप्रथम शिवसनेचे माजी खासदार तथा ऑल महाराष्ट्र शॉपकीपर फेडरेशनचे दिवंगत अध्यक्ष स्व. गजाननजी बाबर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बैठकीत महत्वाच्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी हंगामी अध्यक्ष डोळसे पाटील यांचे अभिनंदन केले. गजानन बाबर यांच्याप्रमाणे निःस्वार्थी कार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शाॅप किपर्स फेडरेशन संलग्न नाशिक जिल्हा रास्त भाव दुकानदार संघटना यांची संयुक्त बैेठक नाशिक येथील हॉटेल कुल पॅलेस येथे आयोजीत करण्यात आली होती. विभागीय अध्यक्ष गणपत डोळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीला सुरुवात झाली. बैठकीत हंगामी अध्यक्षपदी नाशिक विभागाचे गणपत डोळसे पाटील यांची निवड करावी, असा ठराव संघटनेचे खजिनदार विजय गुप्ता यांनी मांडला. ठाणे विभागाचे शांताराम पाटील यांनी त्याला अनुमोदन दिले. कार्यअध्यक्षपद नागपूरचे संजय पाटील यांनी स्वीकारावे, अशी उपसूचना अशोक एडके यांनी मांडली. त्याला बाबुराव म्हमाने व शहाजी लोखंडे यांनी अनुमोदन दिले. दरम्यान मा.आमदार जितेश रावसाहेब अंतपूरकर (देगलूर बिल्लारी) यांची मार्गदर्शकपदी निवड करावी, अशी उपसूचना अशोक एडके यांनी केली, शहाजी लोखंडे यांनी त्याला अनुमोदन दिले.

यावेळी नाशिकचे विभागीय अध्यक्ष गणपत डोळसे पाटील, नागपूरचे संजय पाटील, पुण्याचे शहाजी लोखंडे, मुंबईचे नवीन मारू, कोकणचे शांताराम पाटील, औरंगाबादचे अशोकराव एडके, जनरल सेक्रेटरी बाबुराव म्हमाने, खजीनदार विजय गुप्ता, योगेश बत्ताशे, माधव गायधनी,.ढवळू फसाळे, शाहुराज गायकवाड, चिंतामनी सोडकर, गोपी मोरे, डॉ. गिरीश मोहिते, रमेश भोईर, विजय जैन, वैभव तुपे, नागेश कोथमीरे, राजु गरगटे, दिलीप नवले आणि दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डोळसे पाटील आभार व्यक्त करताना म्हणाले, गेल्या सतरा वर्षांपासून राज्यभरातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या समस्या शासन दरबारी मांडून त्या सोडविण्यासाठी बाबर साहेबांनी जीवाचे रान केले. राज्यभरातील ५५ हजार रेशन दुकानदारांना सुखाचा घास मिळवून दिला. त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून संघटना विस्तार व सर्वसामान्य दुकानदारांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहील. राज्य व जिल्हा संघटनेत नवीन सभासदांनी सामील व्हावे. त्यामुळे संघटना आणखी बळकट होईल, संघटनेचा दबदबा आणखी वाढेल. शासनदरबारी समस्या लवकर सुटतील.

खजिनदार विजय गुप्ता म्हणाले, ऑल महाराष्ट्र शॉपकीपर फेडरेशनच्या माध्यमातून गजानन बाबर यांनी राज्यातील सर्व रेशनीग दुकानदारांची एकत्रित मोट बांधून त्यांना न्यायहक्क मिळवून दिला. काही कालावधीसाठी त्यांचा वारसा डोळसे पाटील यांच्याकडे जाणार आहे. ते त्याला न्याय देतील. लवकरात लवकर सर्व जिल्हा आणि तालुका अध्यक्षांची बैठक घेऊन पुढील कार्यकारणीबाबतचा निर्णय घेण्यात येईल.

नाशिकचे जिल्हा अध्यक्ष निवृत्ती महाराज कापसे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *