Pimpri Crime News : पोलीस आयुक्तांच्या नावाने बदलीसाठी पोलिसांकडून पैसे उकळणारा भामटा जेरबंद

Pckhabar- पोलीस आयुक्तालयातून पोलीस निरीक्षक बोलत असल्याची बतावणी करून बदलीसाठी पोलीस आयुक्तांच्या नावाखाली पोलीस महिला हवालदाराकडून पैसे उकळणाऱ्या भामट्याला एमआयडीसी भोसरी पोलिसांनी कोल्हापूर येथे जेरबंद केले. त्याच्यावर राज्यात विविध ठिकाणी २४ गुन्हे दाखल आहेत.

अमित कांबळे (वय ३२, रा. कोल्हापूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. महिला पोलीस हवालदाराने फिर्याद दिली आहे.
२५ मार्च रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यातील अंमलदाराला आरोपी कांबळे याने फोन केला. आपण पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षातून निरीक्षक पाटील बोलत असल्याची बतावणी केली. पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधी झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे व मोबाईल क्रमांक त्याने मागितले. त्यानुसार त्याला मोबाईलवर माहिती पाठवली. त्यानंतर आरोपी कांबळे याने
कर्मचाऱ्यांना फोन सुरू केले. फिर्यादी महिला हवालदाराला फोन करून १५ हजारांची मागणी केली. त्यानंतर महिलेने वरिष्ठांच्या सांगण्यानुसार पडताळणीसाठी पाच हजार रुपये ऑनलाइन पाठवले. गुन्ह्याचा तपास सुरू असताना कांबळे हा कोल्हापुरातील शाहूपुरी येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्याला जेरबंद करण्यात आले. कांबळेने तोतयागिरी करून यापूर्वी अनेकांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. त्याच्यावर पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यात विविध ठिकाणी २४ गुन्हे दाखल आहेत.










Leave a Reply