Chinchwad News: ब क्षेत्रीय कार्यालयात शिवसैनिकांची घोषणाबाजी; अधिकाऱ्यांची जनसंवाद सभेकडे पाठ

Chinchwad News: ब क्षेत्रीय कार्यालयात शिवसैनिकांची घोषणाबाजी; अधिकाऱ्यांची जनसंवाद सभेकडे पाठ

Pckhabar-‘बाहेर या, बाहेर या, अधिकाऱ्यांनो बाहेर या’, ‘धिक्कार असो, धिक्कार असो, प्रशासनाचा धिक्कार असो’, ‘निकम साहेब मुर्दाबाद, बाकीचे अधिकारी जिंदाबाद’, अशा घोषणांनी शिवसैनिकांनी ब क्षेत्रीय कार्यालयातील सभागृह दणाणून सोडले. जनतेसमोर येता येत नसेल तर कशाला जनसंवाद सभा घेता, असा जळजळीत सवालही संतप्त शिवसैनिकांनी केबिनमध्ये बसून राहिलेल्या अधिकाऱ्यांना विचारला. दरम्यान, दुपारी बारा वाजेपर्यंत अधिकारी केबिनबाहेर न आल्याने जनसंवाद सभा होऊ शकली नाही.

करदाते नागरिक आणि महापालिका प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद व्हावा, नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण व्हावे, यासाठी महापालिका प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांनी महापालिकेच्या आठही प्रभागांमध्ये सोमवारी ( दि. २८) जनसंवाद सभा आयोजित करण्यात आली होती. चिंचवडगावातील ब क्षेत्रीय कार्यालयातही सकाळी १०. ३० ते दुपारी १२ या कालावधीत या सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी सकाळी अनेक नागरिक आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आपल्या तक्रारी घेऊन सभागृहात उपस्थित होते. मात्र, ११ वाजले तरी अधिकारी केबिनबाहेर न आल्याने शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात आला.

युवा सेना उपशहर अधिकरी राजेंद्र तरस यांच्या नेतृत्वाखाली उपस्थित शिवसैनिकांनी केबिनमध्ये बसलेल्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. त्यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी आम्हाला आयुक्तांचा आदेश असल्याचे सांगितले. मात्र, लेखी आदेशाची मागणी करूनही तो अधिकाऱ्यांना सादर करता आला नाही. त्यामुळे शिवसैनिकांनी घोषणाबाजी करून सभागृह दणाणून सोडले. परिणामी वातावरण तणावपूर्ण बनले होते. सहशहर अभियंता मकरंद निकम, क्षेत्रीय अधिकारी अभिजित हराळे व युवा सेना विभाग अधिकारी रोहित माळी, दिनेश माने, शिवसेना उपशहरप्रमुख हरेश नखाते, विभागप्रमुख प्रदीप दळवी, समन्वयक अंकुश कोळेकर, गुरुदास पाटील, प्रहारचे संजय गायके आदी उपस्थित होते.

यावेळी तरस यांनी निकम यांना किवळे, रावेत, मामुर्डी भागातील समस्यांचे निवेदन दिले. त्यावर निवेदनातील प्रश्न सोडविण्याचे आश्वासन निकम यांनी दिल्याची माहिती तरस यांनी दिली.

मागील सभेत मांडलेले मुद्दे, समस्या यांचे निरकरन झाले नाही. मग पुन्हा जनसंवाद सभेचा हा देखावा कशासाठी. वॉटर, गटर मीटर या मूलभूत सुविधा देता येत नसतील तर करदात्यांना जप्तीच्या नोटीस कशासाठी पाठविल्या. जनसंवादमध्ये जनतेशी संवाद झाला नाही, याची तक्रार प्रशासक राजेश पाटील यांच्याकडे करणार आहे. तसेच पुढच्या सभेत अधिकारी केबिनमध्ये बसून राहिले तर सभागृहात उपोषण करण्यात येईल.
-राजेंद्र तरस, उपशहर अधिकारी, युवा सेना.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *