Moshi News : किसान कृषि प्रदर्शनाचे उत्साहात उद्घाटन

Pckhabar- भारतातील सर्वात मोठे कृषि प्रदर्शन असलेल्या किसान 2022 या 29 व्या कृषिप्रदर्शनाचे पुण्यात मोशी येथे उद्घाटन करण्यात आले. दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे पहिल्या येणार्या शेतकर्यांच्या गटातर्फे हे उद्घाटन करण्यात आले.
यामध्ये जालन्यातील ज्ञानेश्वर गव्हाणे, धुळे येथील दिगंबर पाटील,डहाणू येथील मिलिंद बाफना, गुजरात येथील राहुल पटेल,बीडमधील गोरक्षनाथ गायकवाड, सांगलीतील सुनिल शिंदे, तासगाव-सांगली येथील सुशांत सावंत, नंदुरबारमधील संदीप पाटील तसेच महाराष्ट्रातील विविध भागातून आलेल्या परशुराम अडिवाले,विनायक शिंदे,केशव गोडबोले,निवृत्ती आढाव या शेतकर्यांचा समावेश होता. हे प्रदर्शन 27 मार्च 2022 पर्यंत सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत सुरू राहील.
15 एकर प्रदर्शन क्षेत्रावर 300 हून अधिक कंपन्या, संशोधन संस्था, नव उद्योजक शेतीतील नवीन तंत्रज्ञान व उत्पादने सादर करतील. प्रदर्शनात, 5 दिवसांमध्ये देशभरातून सुमारे 1 लाखाहून अधिक शेतकरी भेट देतील असा अंदाज आहे. आधुनिक तंत्रज्ञान व नवे विचार शेतकर्यांपर्यंत पोहोचविणे हे किसान प्रदर्शनाचे मुख्य उद्दिष्ट आहे .
किसान प्रदर्शनाला कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य व इतर शेती क्षेत्रातील मान्यवर संस्थांचा सहभाग व सहकार्य लाभले आहे.
यंदा किसान प्रदर्शनात संरक्षित शेती, पाणी नियोजन, कृषी निविष्ठा, यंत्रसामुग्री, पशुधन, जैव, ऊर्जा, वाटिका व शेती लघु उद्योग अशी विभागवार दालने उभी करण्यात आलेली आहेत. प्रत्येक दालनात त्या विशिष्ठ विभागातील स्टॉल शेतकर्यांना पाहायला मिळतील. शेतीसाठी लागणारी यंत्रे व उपकरणांचे प्रदर्शन खुल्या जागेत केले आहे. पाण्याचे नियोजन व सिंचनासाठी लागणारे तंत्रज्ञान उपलब्ध करून देणार्या 80 हून अधिक कंपन्यांचा सहभाग हे किसान प्रदर्शनातील मुख्य आकर्षण असेल. भारतीय कृषी अनुसंधान परिषद व त्यांच्या संशोधन संस्थाचाही कृषी प्रदर्शनात सहभाग असणार आहे.

मोबाईलचा वाढता वापर आणि डिजीटल इंडिया उपक्रमांमुळे शेतकर्यांशी संवाद साधणे सहज शक्य झाले आहे. यामुळेच उद्योजक नवनवीन सेवा व उत्पादने शेतकर्यांसमोर मांडण्यास उत्सुक आहेत. हे उद्योजक प्रामुख्याने बाजारभाव, जल व्यवस्थापन, शेतमालाचे मूल्यवर्धन, जैवतंत्र या क्षेत्रात नवीन संकल्पना घेऊन येत आहेत. या प्रदर्शनात शेतकरी कृषी क्षेत्रात येऊ घातलेले नवीन तंत्रज्ञान व त्यामुळे निर्माण होणार्या संधींची माहिती घेऊ शकतील.
प्रदर्शन प्रवेशासाठी नावनोंदणी शुल्क रु.150/- आहे. पूर्व नावनोंदणीची सुविधा किसान मोबाईल पवर उपलब्ध आहे. या सुविधेचा वापर केल्यास प्रदर्शन स्थळी येणार्या शेतकर्यांचा वेळ वाचेल.
प्रदर्शनाच्या प्रवेशव्दारावर शेतकर्यांचा वेळ वाचवण्यासाठी, मोबाईल अॅपद्वारे आगाऊ नावनोंदणीची सोय केली आहे. ही संख्या 100,000 ओलांडण्याची अपेक्षा आहे.
किसान मोबाईल पवर सहभागी कंपन्या व त्यांच्या उत्पादनांची माहिती उपलब्ध आहे, जेणे करून शेतकरी व प्रदर्शक संस्थांमधील संवाद आधीपासूनच सुरु होईल.
या वर्षी किसान प्रदर्शन मोशी येथे नवीन बनत असलेल्या अद्ययावत खुल्या प्रदर्शन केंद्रात होत आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणतर्फे विकसित होत असलेले ह्या केंद्राचे काम बी.जी. शिर्के कन्स्ट्रक्शन कंपनी करत आहे.
मोशी येथील प्रदर्शन स्थळ हे पुणे शहरापासून सुमारे 20 कि. मी. अंतरावर आहे.







Leave a Reply