Dehu News : देहूत आज जगद्गुरू
श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळा

Pckhabar- जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळा आज (रविवार) साजरा होत आहे. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक श्रीक्षेत्र देहूत दाखल होत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी देहूनगरी सज्ज झाली आहे. भाविकांना सोयी-सुविधा पुरविण्यासाठी संत तुकाराम महाराज संस्थान आणि देहू नगरपंचायत प्रशासनाने सर्व तयारी केली आहे. आज पहाटेपासूनच धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे.

तुकाराम बीज सोहळ्यासाठी देहूत विविध भागांतून दिंड्या दाखल झाल्या आहेत. इंद्रायणीचा काठ भाविकांनी फुलून गेला आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक, वारकरी आणि दिंड्यांचे आगमन सुरू आहे. वारकऱ्यांनी अखंड हरिनाम, कीर्तनासाठी घाटावर, तसेच अनेक ठिकाणी मंडप उभारले आहेत. इंद्रायणी नदीच्या दोन्ही बाजूंनी शेतात, मैदानात दिंड्यांनी मुक्कामासाठी आसरा घेतला आहे. ठिकठिकाणी सुरू असलेले भजन, हरिपाठ, चिपळ्या, टाळ-मृदंगांच्या गजराने आणि हरिनामाच्या जयघोषाने देहूनगरी दुमदुमत आहे. भाविकांसाठी स्वच्छ पाणी, मोफत मास्क वाटप, दर्शनरांगेत भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी छताची सुविधा करण्यात आली आहे. कोरोना संकट पूर्णपणे संपुष्टात आलेले नसल्याने मास्क नसणाऱ्या भाविकांना मंदिरात प्रवेशबंदी आहे. भाविकांनी सामाजिक अंतराचे पालन करावे, गाभान्यात प्रवेश न करता दुरूनच दर्शन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.











Leave a Reply