Pimpri News : पिंपरी-चिंचवड महापालिकेवर आजपासून प्रशासकराज

Pckhabar- महापालिकेची पंचवार्षिक मुदत संपुष्टात आल्याने आज (सोमवार)पासून पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रशासकीय राजवट अस्तित्वात आली आहे. निवडणुका होईपर्यंत महापालिकेचा कारभार तांत्रिकदृष्ट्या आयुक्त राजेश पाटील यांच्या हाती राहणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकांसाठी प्रशासनाने गेल्या काही महिन्यांपासून तयारी सुरू केली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रशासनाने प्रारूप प्रभागरचना तयार करून त्यावर हरकती, सूचना मागविल्या होत्या. त्यावर नुकतीच सुनावणी घेऊन ती अंतिम मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविली आहे. असे असले तरी पिंपरी-चिंचवड महापालिकेची पंचवार्षिक मुदत १३ मार्च रोजी संपुष्टात आली. या मुदतीत महापालिकेच्या निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळे महापालिकेवर प्रशासकीय राजवट आजपासून लागू झाली आहे.
महापौर उषा ढोरे, उपमहापौर हिरानानी घुले, स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, सभागृहनेते नामदेव ढाके यांच्यासह महापालिका पदाधिका-यांनी महापालिकेची वाहने प्रशासनाकडे जमा केली आहेत. तसेच पदाधिकाऱ्यांनी महापालिकेची सुरक्षा व्यवस्थाही परत केली आहे. महापालिका पदाधिकाऱ्यांच्या दालनात सकाळपासून ते सायंकाळपर्यंत कार्यकर्त्यांची तसेच विविध कामे घेऊन येणाऱ्या नागरिकांची रीघ असायची. परंतु, आजपासून शुकशुकाट पाहायला मिळेल. महापालिका आयुक्त राजेश पाटील हे प्रशासक म्हणून महापालिकेचे कामकाज पाहणार आहेत.










Leave a Reply