Article By Dr. Anjali mulke : खोट्या पाट्या अन् मागास चौकटीचं रुंदीकरण..!

Article By Dr. Anjali mulke : खोट्या पाट्या अन् मागास चौकटीचं रुंदीकरण..!

डॉ.अंजली मुळके

Pckhabar- कोविडमुळे बंद असलेल्या शाळा उघडल्या गेल्यात.. आज कित्येक महिन्यांनी, जवळपास दोन वर्षांनी शाळेत मुलाला पाठवलं..
ऐनवेळी संपूर्ण क्षमतेने शाळा सुरू करण्याच्या तत्काल निर्णयामुळे, जरा धावपळच झाली.. आपल्या लाडक्या लेकरांच्या शाळेच्या युनिफॉर्म, बॅग, इ. च्या खरेदीला पालकांची दुकानांमध्ये झुंबड उठली…

पण पालक सचोटीने ही झुंबड झुगारून देत आपापल्या पाल्यांसाठी मोठ्या उत्साहाने सर्व शालेय खरेदी, होईल तशा पद्धतीने करतांना दिसले..

शेवटी ‘आपल्या लेकरांच्या शिक्षणात कसली तसूभरही उणीव राहायला नको’ ही मानसिकता सर्वच पालकांची असणे रास्त आहे..
मायबाप शेवटी मुलांच्या भविष्याचाच विचार करणार..!

सगळं साग्रसंगीत साजरं करून, मी माझ्या मुलाला तयार करून शाळेच्या पहिल्या दिवसाप्रमाणे, कौतुकाने शाळेत पाठवून थोड्याशा उशिरानेच क्लिनिक ला पोहचले.. पोरगा शाळेत गेल्याच्या समाधानाने ओपीडीचं काम सुरू केलं..

तेवढ्यात, मला एका ढोलक्याचं वादन ऐकू आलं..
क्लिनिकच्या प्रवेशाचा आणि समोरचा भाग काचेचा असल्याने मला आतमधून बाहेरचं स्पष्ट दिसतं..
तसं मी आवाजाच्या दिशेने बाहेर पाहिलं, तर एक “पोतराज” अवतारातील पंचवीशीतील महिला, ते ढोलक वाद्य ‘गुब्बू गुब्बू’ सारखा आवाज काढत वाजवतांना दिसली..
कळकटलेली घोट्यापर्यंत येणारी साडी अन् त्या साडीचा पातळसा पदर डोक्यावर घेऊन, त्यावर पोत्यात काहीतरी बांधून ओझं वागवीत, गळ्यात ढोलक बांधून त्याला वाजवत, निःशब्दपणे थांबत थांबत पुढे चालत होती..!
तिच्या गुडघ्यापर्यंत येणाऱ्या तिच्या चिमुकल्या, जेमतेम अडीच तीन वर्षांच्या पिल्लाला मी तिच्याभोवती बागडतांना पाहिलं..
त्यातच ते लेकरू, आजूबाजूच्या दुकानात जाऊन चिल्लर गोळा करतांना दिसलं..
तेवढ्यात, बाजूच्या दुकानातून येत, माझं क्लिनिकचं काचेचं दार अर्धवट ढकलत एक माझ्या मुलाच्या वयाचाच, आठ नऊ वर्षांचा पोरगा माझ्या समोर डोकावत आला..!
ह्याच्या खांद्यावर खरी त्या “पोतराजगी”ची मदार होती..

मी दोन क्षण त्याच्याकडे बघतच राहिले..

अंगात वर मळकटलेलं शर्ट..
डोक्याला गुंडाळलेली ‘आई कडक लक्ष्मीच्या’ वस्त्राची हरवी चिंधी..
कपाळाला कपाळभर भरलेलं ‘आईचं मळवट’..
कंबरेपासून खाली घोट्यापर्यंत लोंबकळणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण पोतराजी रंगबिरंगी कपड्यांच्या उभ्या पट्ट्यांची गर्दी..
पायात मोठाल्या घुंगरांची जड जायबंदी..
आणि..
सगळ्यात महत्त्वाचं काम करणारा, अंगावर आसूड ओढणारा, चिंध्यांचा जाड राक्षसी चाबूक..!!
जणू परिस्थिती त्या कोवळ्या लेकराच्या कोवळ्या पाठीवर त्या चाबकाने आसूड ओढतेय असं वाटलं..

या सर्वांमध्ये, त्याच्याकडे सगळ्यात प्रभावी असणारी एक ‘चीज’ होती, ती म्हणजे, त्याचे निरागस डोळे…!
त्या डोळ्यांनी तो बोलत होता..

मी पाहतच होते, तसे त्याने, स्वतःचे हात पुढे केले, नि मला एकही शब्द न बोलता, डोळ्यांच्या माध्यमातून पैस्यांची मागणी केली..

हातात पैसे घेत, मी त्याला नाव विचारलं..
तसा तो गोंधळला..
हे असं कोणी बोलत असतं, असा अनुभव नसावा कदाचित त्याला..
मी म्हणलं, “बाळा नाव सांग तुझं..”
तो म्हणाला,”नाव नाही..!”
मी-“बरं, शाळेत का नाही गेला..?
कुठंय तुझी शाळा..?
जातोस की नाही शाळेत..?”
तसा अडखळत तो म्हणाला,” जातो, गावाकडं हाय शाळा..!”
मी-“कोणत्या वर्गात आहेस..?”
त्याला ‘वर्ग’ हा शब्द कळला नसावा की काय.. तो परत गोंधळला..
मी-” अरे बाळा, कितवीला आहेस..? शाळेत जा आता, शाळा सुरू झाली ना..!”

माझ्या बोलण्याचं जणू काहीतरी अघटित घडल्यासारखं वाटून, थोडं असुरक्षित भाव चेहऱ्यावर आणत, तो पैसे न घेताच, त्याच्या रस्त्यावर उताराला थोडं पुढे गेलेल्या आईकडे पळत सुटला..!
मी ‘अरे, अरे, हे घे’, म्हणलेले शब्दही त्याच्या कानी पडले नाहीत..!

दुसरी अशीच एक घटना आहे, जी काहीच दिवसांपूर्वी घडली होती..

क्लिनिक मध्येच ओपीडी चालू असताना , असंच मला बाहेर साईबाबांचं गाणं वाजवत देवदेवतांचे फोटो सजवून ठेवलेला छोटासा रथ रस्त्यावरून जातांना दिसला..
त्या रथाच्या पुढून पारंपरिक पोशाखात असलेले नवरा बायको चालत होते..
पुरुष रथ ओढत होता, तर स्त्री रथाच्या बाजूने हातात हळदी कुंकवाचं अन् अंगाऱ्याचं ताट घेऊन चालत होती..
साईबाबांचं गाणं यासाठी, की, साईबाबा हे एकमेव आराध्य आहेत, ज्यांना हिंदूही मानतात आणि मुस्लिमही..
त्यामुळे, दोन्ही धर्मीय लोकांकडून पैसा मिळवता येतो, ही मेख..!
इथं देव, देवत्व किंवा धार्मिक आस्थेपेक्षा, पोटाची खळगी जास्त उचल खाते..!!
पोटासाठी धर्माचा, आस्थेचा बाजार मांडावा लागतो..
श्रद्धा, अंधश्रद्धेच्या कुबड्या दोन्हीकडून घेत आयुष्याची बिकट वाट चालावी लागते..

तेवढ्यात माझ्या क्लिनिक च्या दाराला अर्धवट उघडून एक त्यांचा नऊ दहा वर्ष वयाचा मुलगा आत डोकावत म्हणाला,”ताई, पैसे द्या की, साईबाबांच्या चरणी..!”

मी म्हणलं,” नाव काय रे तुझं..?”
तसा तो चटकन उत्तरला,”*** इंगळे”..
मी-“अरे शाळा कर ना बाळा, शाळेत का नाही गेला तू..?”
तो-“शाळा गावाकडं हाय..!”
मी-“कोणत्या गावचा रे तू..?”
तो-“सांगलीकडं..”
मी-“हे घे पैसे, पण हे असं फिरू नको आता.. आई बाबाला सांग, की, डॉक्टर ताई मला शाळेत जा म्हणत होत्या..! मला गावाकडं नेऊन सोडा..!”
तसा तो “हो” म्हणत पैसे घेऊन पळत रथाच्या दिशेने गेला..!

या मुलांची जात देखील बोलतांना मला कळली होती..
मी मुद्दाम जातीचा उल्लेख इथं करत नाही..
पण, *भटकंती करून उदरनिर्वाह करणाऱ्यांची चौकट आता कुठल्या विशिष्ट जातीसाठी राहिली नाही, हे इथं मला नमूद करायचं आहे..!*
त्या चौकटीने, ‘कुलीन’, ‘प्रस्थापित’ वगैरे म्हणवणाऱ्या जातींना आता नकळत सामावून घेतलं आहे..!

ही मुलं आर्थिक परिस्थितीने गांजलेली जरी असली, तरीही या आपल्या सामाजिक व्यवस्थेमध्ये त्यांच्या नावापुढे, ‘ आमक्या कुलीन’, ‘प्रस्थापित’ किंवा ‘सवर्ण’ इ. लेबलं पिढ्यानपिढ्या चिकटलेली आहेत..
त्या लेबलांचा ‘मोठेपणा’ ना या मुलांना शैक्षणिक साहाय्य उपलब्ध करून देतो ना की त्यांच्या पोटाची खळगी भरून देतो..
ती लेबलं आता नकोशी असतांनाही या आपल्या समाजाने माथी मारल्यामुळे जबरदस्ती त्यांना ‘मिरवावी’ लागत आहेत..
आणि मोठेपणाच्या ह्या लेबलांमुळे, आर्थिक परिस्थिती बेताहून बेताची असतांना देखील शैक्षणिक आणि सामाजिक कसलेही साहाय्य मिळत नसल्याने, त्या ‘भटकंतीच्या चौकटीत’ जाऊन हे ही लोकं विसावत आहेत..

सवर्ण म्हणवल्या जाणाऱ्या जातीतील लोक आता पिढ्यानपिढ्या उलटल्यानंतर हळूहळू दारिद्र्याच्या गर्तेत ओढल्या गेले, तरीही, कैक वर्षे जुन्या राजकीय धोरणांमध्ये, तसूभरही बदल झालेला नाही..!
तथाकथित ‘सवर्ण’ म्हणवल्या जाणाऱ्या मुलांना दोन वेळची भाकरी सुद्धा मिळत नाही, अशी दरिद्री परिस्थिती असतांना देखील, केवळ ते ‘सवर्ण’ आहेत, म्हणून, शाळेत त्यांना फुकटचा गणवेश, फुकटचे शैक्षणिक साहित्य किंवा कसल्या स्कॉलरशीप्स सुविधा मिळत नाहीत..!
उत्पन्नाचे प्रमाणपत्र काढून त्याचा लाभ घ्यावा, इतकीही त्यांच्यात शैक्षणिक सुबत्ता उरली नाही..!

कधीकाळी जमीनजुमला बाळगून असणारे आता जमिनीच्या तुकडीकरणाचे व विभाजनाचे बळी झाले आहेत..
कसून खाल्लेल्या मातीच्या वरचेवर होणाऱ्या तुकड्यांनी यांच्या आयुष्याचा घास घेतला आहे..

बरं, त्या चौकटीतून कदाचित शैक्षणिक, नोकरी आरक्षण, रेशन आर्थिक आदि साहाय्यामुळे कोणी मागासवर्गीय लोक बाहेर निघतही असतील..
किंबहुना बरेच मागासवर्गीय बाहेर निघालेत, त्याचा आनंद आहे..!
त्यातील बरेच जण आता ‘प्रस्थापित’ झाले आहेत..!
पण तरीही सवलतींचा लोभ त्यांना काही सुटत नाही..
आर्थिक, सामाजिक सक्षम बनलेली अशी कुटुंबं, जातीच्या नावावर, आपल्याच इतर खऱ्या गरजू मागासवर्गीय बंधुभगिनींच्या सवलती बेशलाकपणे लाटत आहेत आणि खरे वंचित अजूनही वंचितच राहतात, असं चित्र बऱ्याचदा पाहायला मिळतं..!

सर्वच मागासवर्गीय जन या सवलतींपर्यंत पोहचतात असेही नाही..
आजही अनेक भटक्या जाती वाडी-पाड्यांमध्ये तसेच मागास जीवन जगत आहेत..!
या लोकांपासून, ते नवीन सामावलेल्या लोकांच्या सर्व एकत्रीकरणामुळे ही जी चौकट आहे, ती अधिकाधिक रुंदावत चालली आहे..!

अशी कित्येक मुलं मी पाहतेय..
आज मनात एखाद्या भाल्याची टोच जाणवावी, तशी एक कळ जाणवली..

आपल्या लेकराला एवढ्या कौतुकाने शाळेत पाठवून आपल्यासारखे पालक आपापल्या पाल्यांच्या भविष्याची तजवीज करण्यासाठी जी धडपड करतात.. तशीच धडपड या वर्गाच्या पालकांची पण असते..
पण त्या दोन्ही धडपडीत एक मोठा फरक असतो, तो म्हणजे प्राधान्याचा..!

काही लोक जिथं कमावते असल्याने पोटाचा विचार येण्याचा प्रश्न नसतो, ते पाल्यांच्या भविष्यासाठी शैक्षणिक तजवीज ज्यादा करतात, तिथं हे गरीब पालक मात्र, प्राधान्याने जगण्यासाठी, जिवंत राहण्यासाठी, पोटाची खळगी भरण्यासाठीची तजवीज आधी करतात.. आणि मग, पोट भरून जमत असेल तर मुलांना चार अक्षरं पढवण्याचा विचार करतील..
पोट समाधान असणारे पालक आपल्या पाल्यांना भविष्याच्या जडणघडणीत कसलीही उणीव भासू न देण्याचा मानसिकतेत असतात..
तर दुसऱ्या बाजूला भटकंती करत मूलभूत गरजांसाठी झगडणाऱ्या पालकांची आपल्या पाल्याच्या भविष्याबाबत काय मानसिकता असावी..!!??

हे प्राधान्य इतक्या फरकाने वेगळं असावं, ह्याला आपलीच सामाजिक व्यवस्था आणि राजकीय अनास्था जबाबदार आहे.. तसंच पिढ्यानपिढ्या चालत आलेली समाजाची मानसिकता देखील जबाबदार आहे..!

खरे गरजू वेगळे आणि लाभार्थी वेगळेच होत आहेत..!
मागासवर्गीय असो की सवर्ण असो.. *आर्थिक विवंचना ही जात-धर्म बघून येत नसते..*
*पोटाची भूक आणि आयुष्याच्या मूलभूत गरजा ह्या जात-धर्म आणि वर्ग विचारून आपली तीव्रता कमीअधिक करत नाहीत..*
कोणी अमुक जातीचा म्हणून त्याला जास्त भूक लागते अन् कोणी सवर्ण लेबल लावलेला आहे, म्हणून त्याची भूक कमी, अशातला भाग असतो का..!!??

खोट्या मोठेपणाच्या पाट्या मिरवणाऱ्या जातींना आता त्या पाट्यांचं ओझं होऊ लागलं आहे..!
गंजलेल्या त्या पाट्यांचा गंज आता त्यांचं आयुष्यच गंजवू लागलं आहे..
तरीही सामाजिक दबावापोटी ह्या पाट्यांचं ओझं यांना वागवणं भाग पडत आहे, जे की त्या लाभ तर सोडाच, पण उलट नुकसान करणाऱ्या ठरत आहेत..!

भविष्य केवळ आर्थिक उच्चवर्गीयांच्या मुलांनाच असतं का..!?
जातीपातीच्या पल्याड ‘आर्थिक मागासवर्गीय’ नावाच्या ह्या वर्गाच्या मुलांनाही भविष्य असायला हवं.. नव्हे, ते असतंच..!
उज्ज्वल भविष्याचे ते देखील अधिकारी आहेत..!

म्हणूनच, आता ह्या मागासलेल्या चौकटीचा आता जातीधर्माच्या अनुषंगाने नव्हे, तर आर्थिक परिस्थितीच्या अनुषंगाने विचार व्हायला हवा..
अन्यथा, दारिद्र्याच्या गर्तेत सामावत जाणाऱ्या लोकांच्या ह्या देशाच्या ‘लोकशाहीचा’ आणि ‘संविधानाचा’ आत्मा, अशा लोकांचे भविष्य गिळंकृत केल्याबद्दल, ह्या व्यवस्थेला कधीही माफ करणार नाही..!!

-©® डॉ.अंजली मुळके

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *