Pimpri News : विरोधकांच्या प्रमाणपत्राची गरज नाही, भाजपाचे काम बोलतयं !

Pimpri News : विरोधकांच्या प्रमाणपत्राची गरज नाही, भाजपाचे काम बोलतयं !

– सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांची सडकून टीका

Pckhabar-देशात सर्वदूर भारतीय जनता पार्टीची सत्ता येताना दिसत आहे. नुकत्याच ५ राज्यांमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला चार ठिकाणी स्पष्ट बहुमत प्राप्त झाले आहे. आगामी काळातही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. आणि या ठिकाणीसुध्दा शहरातील नागरिक भाजपाचीच सत्ताधारी पक्ष म्हणून निवड करणार आहे. आगामी निवडणुकीत आमच्या १०० पेक्षा जास्त जागा निवडून येणार हे निर्विवाद सत्य आहे. याची चाहूल लागल्यामुळे राष्ट्रवादीसह शिवसेना आणि काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी भाजपावर खोटेनाटे आरोप करुन भ्रष्टाचार झाला असा “ साप साप म्हणून भुई थोपटण्याचा ” केविलवाणा प्रयत्न करताना दिसत आहेत. मुळात आम्ही शहरात २०१७ पासून विविध विकास कामे केलेली आहेत. ५ वर्षात झालेल्या महासभांमध्ये विरोधक मूग गिळून गप्प बसले आणि आता न झालेल्या भ्रष्टाचारावर बोलण्याचा त्यांना कसलाही नैतिक अधिकार नाही, अशी टीका सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केली.

शहरातील जनतेने गेल्या १५ ते २० वर्षांपासून राष्ट्रवादीने महापालिकेत केलेल्या भ्रष्टाचाराला कंटाळून २०१७ मध्ये झालेल्या महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या हाती सत्ता सोपवली. या पाच वर्षाच्या काळामध्ये भाजपाने शहरातील गरजा ओळखुन पुढील ३० वर्षाचे नियोजन करुन विविध विकास कामे मार्गी लावली आहेत. आता राष्ट्रवादीकडे नागरिकांसमोर जाण्यासाठी कसलेही ठोस मुद्दे नाहीत. त्यामुळे शहरातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. वास्तविक, महापालिकेमध्ये स्मार्ट सिटी, स्थायी समिती किंवा सर्वच विषय समित्यांमध्ये आमच्याबरोबर राष्ट्रवादीसह शिवसेनेचेसुध्दा त्या प्रमाणात सदस्य आहेत. विकासकामांचे विषय संबधित सभेमध्ये पटलावर असताना या मंडळीनी गेल्या ५ वर्षात कोणत्याही सभेमध्ये त्यांचा आक्षेप नोंदविलेला नाही. यांना भ्रष्टाचार झाला असे वाटतच होते, तर त्यावेळेसच तो रोखता का आला नाही आणि आता कुठला एकही पुरावा नसताना अचानक भ्रष्टाचार झाल्याचा साक्षात्कार कसा होतो? हे न समजण्याइतकी जनता दुधखुळी नाही. सभेमध्ये मंजुर झालेल्या विषयांचा पुरावा कोणाला बघायचाच असेल तर प्रत्येक सभेचा सभावृत्तांत महापालिकेमध्ये उपलब्ध आहे. महापालिकेमध्ये गेल्या १५ ते २० वर्षापासून राष्ट्रवादीने जोपासलेले जे ठेकेदार आहेत तेच ठेकेदार आत्तासुध्दा महापालिकेमध्ये काम करत आहेत. ज्या ठेकेदारांनी ‘एफडीआर’ च्या बाबतीत घोटाळे केले ते विरोधकांचेच बगलबच्चे आहेत. या ५ वर्षाच्या काळामध्ये भाजपाने या ठेकेदारांना नियमानुसार काम करण्यासाठी भाग पाडल्यामुळे राष्ट्रवादीची दुकानदारी पूर्ण बंद पडली आहे. याचा रोष आता हे भाजपावर काढत आहेत, असा घणाघातही ढाके यांनी केला आहे.

विरोधकांचा पर्दाफाश करणार: ढाके

राज्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता आहे. स्थानिक पदाधिकारी यांच्याकडे जर भ्रष्टाचाराचे पुरावे होते, तर वेळीच त्याबाबत चौकशी का लावली नाही? किंवा न्यायालयीन कारवाई का करावीशी वाटली नाही? वास्तविक या ५ वर्षामध्ये भाजपाने सर्वसामान्य नागरिक केंद्रस्थानी ठेऊन विविध विकासाभिमुख कामे व नवनविन योजना महापालिकेत आणल्या आहेत. भाजपाने विकास कामे करताना ती अत्यंत पारदर्शीपणे केलेली असून आम्हीच पुढील आठवड्यात विरोधकांची महापालिकेतील दुकानदारी जनतेसमोर आणू. शिवाय ज्यांनी ज्यांनी गेल्या २०-२५ वर्षात महापालिकेला स्वत:ची जहागीरी समजून महापालिकेच्या वास्तुंमध्ये आपली दुकाने थाटली आहेत. त्याचाही लवकरच पर्दाफाश करु, असा पलटवार सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *