Pimpri News : दुचाकी वाहनांसाठी आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी नवीन मालिका

Pimpri News : दुचाकी वाहनांसाठी आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी नवीन मालिका

Pckhabar- दुचाकी वाहनांसाठी सुरु होणाऱ्या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक तीनपट शुल्क भरून चारचाकी वाहनांसाठी राखून ठेवण्यासाठी तसेच उर्वरित क्रमांकासाठी दुचाकी वाहनांबाबत आगाऊ अर्ज स्वीकारणेबाबत व लिलाव कार्यपद्धती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे लवकरच दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. वाहनांची नवीन मालिका चालू होण्याच्या दिवशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी -चिंचवड (नवीन इमारत, मोशी) येथे मोठया प्रमाणावर इच्छुकांची गर्दी होते व त्यामुळे कार्यालयीन व्यवस्थेवर त्याचा ताण पडतो व नागरिकांनाही याचा त्रास होतो. नागरिकांचा होणारा त्रास कमी व्हावा व त्यांना हवा असणारा आकर्षक नोंदणी क्रमांक उपलब्ध असल्यास त्यांना सुलभतेने तो मिळावा, यासाठी ज्या चारचाकी वाहन मालकांना नव्याने सुरु होणा-या दुचाकी मालिकेतील आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क (तीनपट शुल्क) भरून हवे असतील त्यांनी 14 मार्च रोजी कार्यालयीन वेळेत सकाळी 11 ते दुपारी 2.30 वा.पर्यंत विहित नमुन्यात अर्ज करावा.

दुचाकी मालिकेतील दुचाकी वाहनांसाठी उर्वरित आकर्षक नोंदणी क्रमांक आरक्षित करण्यासाठी 15 मार्च रोजी कार्यालयीन वेळेत सकाळी 11 ते दुपारी 2.30 या दरम्यान विहित नमुन्यातील अर्ज सादर करावा.

अर्ज कार्यालयाच्या नवीन वाहन नोंदणी विभागात धनाकर्ष (डीडी), पत्त्याचा पुरावा, आधारकार्ड, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह आधारकार्डला लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकासह जमा करावा. हा डीडी DY.R.T.O. PIMPRI CHINCHWAD यांच्या नावे राष्ट्रीयकृत, अनूसचित बँकेचा पुणे येथील असावा. अर्जदाराने ओळख पटविण्यासाठी अर्जासोबत फोटो ओळखपत्र तसेच पत्त्याच्या पुराव्यासाठी आधारकार्ड, दूरध्वनी देयक आदींची साक्षांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे.

चारचाकी वाहनांसाठी क्रमांकांची यादी 15 मार्च रोजी सकाळी कार्यालयीन नोटीस बोर्डवर लावण्यात येईल. यादीतील अर्जदारांना लिलावासाठी जर जास्त रकमेचा डीडी जमा करावयाचा असेल तर त्यांनी 15 मार्च रोजी दुपारी 2.30 पर्यंत सीलबंद पाकिटात कार्यालयात जमा करावा. डीडी जमा केला त्याच त्याच दिवशी दुपारी 3.30 वाजता उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या कक्षात नोंदणी प्राधिकारी यांचे उपस्थितीत पात्र व्यक्तीसमोर संबंधीत अर्जदार लिफाफे उघडून ज्या अर्जदाराने विनिर्दीष्ट शुल्कापेक्षा जास्तीत जास्त रकमेचा डीडी सादर केला असेल त्यास नमूद पसंती क्रमांक वितरीत केला जाणार आहे.

दुचाकीची यादी 16 मार्च रोजी कार्यालयीन नोटीस बोर्डवर लावण्यात येईल. दुचाकीसाठी अर्जदारांना लिलावाकरीता जर जास्त रकमेचा डीडी जमा करावयाचा असेल तर त्यांनी 16 मार्च रोजी दुपारी 2.30 पर्यंत सीलबंद पाकिटात कार्यालयात जमा करावा व त्याच दिवशी दुपारी 3.30 वाजता उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या कक्षात नोंदणी प्राधिकारी यांचे उपस्थितीत पात्र व्यक्तीसमोर (संबंधीत अर्जदार) लिफाफे उघडून ज्या अर्जदाराने विनिर्दीष्ट शुल्कापेक्षा जास्तीत जास्त रकमेचा डीडी सादर केला असेल त्यास नमूद पसंती क्रमांक वितरीत केला जाणार आहे. वाहन क्रमांक आरक्षित केल्याचे मॅसेज मोबाईलवर आल्यानंतर पाचव्या दिवशी पावती कार्यालयातून मिळणार आहे.

एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर केले नाही तर राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व शुल्क सरकारजमा होईल. कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेली फी परत करता येणार नसल्याचे उप प्रादेशिक परिवह अधिकारी यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *