Pimpri News: “विद्यार्थिनींनी स्वावलंबी व्हावे!”

Pimpri News: “विद्यार्थिनींनी स्वावलंबी व्हावे!”

Pckhabar- “समाजातील सर्वात कनिष्ठ स्तरातील विद्यार्थी येथे सर्वांगीण शिक्षण घेत असले तरी विद्यार्थिनींनी स्वावलंबी व्हावे अन् भावी काळात समाजासाठी योगदान द्यावे!” असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या वनिता सावंत यांनी गणेशनगर, थेरगाव येथे मंगळवार, दिनांक ०८ मार्च २०२२ रोजी केले. जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचालित खिंवसरा-पाटील शिक्षण संकुलाने समाजातील साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान केला. त्यामध्ये प्रा.डॉ. रंजना नवले यांच्या अध्यक्षतेखाली कवयित्री संगीता झिंजुरके, कमल सोनजे, सुवर्णा जाधव, अश्विनी पारखी, मंगल बारणे, सुप्रिया कुलकर्णी, करुणा नामदे, सुमन कसबे, सुनीता शिंदे, अंजली पाटील, पल्लवी आळतेकर, स्मिता कुरळे, करिष्मा कक्कर या महिलांना सन्मानचिन्ह आणि ग्रंथ प्रदान करून गौरविण्यात आले.

सामाजिक कार्यकर्त्या कल्पना दाभाडे यांनी आपल्या मनोगतातून, “संघर्षातून निश्चितपणे यशप्राप्ती होते!” असे विचार मांडले; तर संगीता झिंजुरके यांनी आपल्या सुरेल आवाजात ‘सावित्रीची लेक तू’ , ‘नको विसरायला बाईपण’ , ‘हिंमत’ , ‘संवाद’ , ‘शृंगार मराठीचा’ या कवितांचे प्रभावी सादरीकरण करून इयत्ता सहावी ते नववीमधील विद्यार्थिनी आणि सर्व उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. महिलादिनाच्या निमित्ताने महिला पालकांसाठी पत्रलेखन, रांगोळी, हस्तकला, वेषभूषा या विधांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पत्रलेखन स्पर्धेत सीमा होळगे (प्रथम), अरुणा जाधव (द्वितीय), शालिनी शेळके (तृतीय) विजेत्या ठरल्या. रांगोळी स्पर्धेत शबाना शेख, पल्लवी गोरे, समीक्षा जोशी यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक घोषित करण्यात आले. वेषभूषेत उषा क्षीरसागर (प्रथम), हेमा खिलारे (द्वितीय), स्वाती शिंदे (तृतीय) क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. पाककला स्पर्धा दोन गटांत घेण्यात आली होती. प्रथम गटात सोनाली शिंदे (प्रथम), जयश्री गौडगाव (द्वितीय), उषा कांबळे (तृतीय) आणि दुसऱ्या गटात कोयना भोईर, कल्पना जगदाळे, जयश्री गरड, मनीषा गायकवाड यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ क्रमांक पटकावले.

जयश्री गायकवाड यांनी स्पर्धांचे परीक्षण केले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात विद्यार्थिनींनी गीतनृत्यांचे बहारदार सादरीकरण केले. पायल गायकवाड या विद्यार्थिनींने अस्खलित इंग्रजीमध्ये कविता म्हटली. विद्यार्थ्यांच्या स्वागतगीताने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. मुख्याध्यापक नटराज जगताप यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या संयोजनात बालवाडी प्रमुख आशा हुले, संकुलाचे संस्थापक-सदस्य अशोक पारखी, संजय कुलकर्णी यांच्यासह महिला शिक्षिकांनी परिश्रम घेतले. गणेश शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. संदीप बरकडे यांनी आभार मानले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *