Pimpri News: कन्या विद्यालयात विविध कार्यक्रमांतून स्त्री शक्तीला सलाम

Pckhabar- रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालय पिंपरी वाघेरे या शाळेत आज आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात संपन्न झाला.
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विद्यार्थिनींच्या कला गुणांना वाव देण्यासाठी विद्यालयामध्ये विविध क्षेत्रात स्वकर्तृत्वाचा ठसा उमटवून सर्वांप्रति आदर्श असणाऱ्या महिलांच्या वेशभूषा, विविध वैज्ञानिक उपकरणे व रांगोळीच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शारदा शेटे यांचे हस्ते करण्यात आले.

यावेळी विद्यालयाच्या सन्माननीय पर्यवेक्षिका ऊर्मिला पाटील व सर्व अध्यापक वृंद उपस्थित होते. या प्रदर्शनात इयत्ता 5 वी ते 9 वी च्या
विद्यार्थिनींनी पवनचक्की, पृथ्वी गोल, पाण्याची घनता, तृण धान्य, ज्वालामुखी उद्रेक, हवेचा दाब, हरित शेती इत्यादी विषयांवर वैज्ञानिक उपकरणे तयार केली.
तसेच वैज्ञानिक रांगोळ्यांच्या माध्यमातून फुलांचा उभा छेद, मानवी उत्सर्जन संस्था, कार्बन सायकल, पोलर ट्यूब, चेतापेशी , मानवी हृदय इत्यादी विषय रांगोळीच्या माध्यमातून साकारले आहेत.
यानंतर विद्यालयात स्त्री शक्तीला सलाम करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात विविध सामाजिक , शैक्षणिक व उच्च पदस्थ कार्यात ठसा उमटविलेल्या प्रेरणादायी महिलांच्या वेशभूषा साकारलेल्या ‘अनंत आमुची ध्येयासक्ती अन अनंत आमुच्या आशा’ या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शारदा शेटे यांनी करताना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना व रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील यांना प्रथम अभिवादन करून आज महिलांनी विविध क्षेत्रातील विविध उच्च पदे भूषविली असून क्षमतेच्या जोरावर यशाचे शिखर गाठणाऱ्या राणी लक्ष्मीबाई पासून ते कल्पना चावला पर्यंतच्या स्त्रियांचे कार्य आपल्यासाठी प्रेरणादायी असल्याचे मनोगत व्यक्त केले.
यावेळी इयत्ता 5 वी तील विद्यार्थीनिनी सावित्रीबाई फुले, आनंदीबाई जोशी, मुक्ताबाई, पी . टी उषा, रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील, लता मंगेशकर, अहिल्यादेवी होळकर, सिंधूताई सपकाळ, राजमाता जिजाऊ, मदर तेरेसा, कविता राऊत, एक आई, यांच्या वेशभूषा साकारल्या.
या सर्व विद्यार्थिनींनीना विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शारदा शेटे सन्माननीय पर्यवेक्षिका उर्मिला पाटील यांनी प्रोत्साहन देऊन कौतुक केले. यावेळी विद्यालयातील सर्व अध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीतम फिसरेकर यांनी केले. विद्यालयाच्या पर्यवेक्षिका उर्मिला पाटील यांनी आभार व्यक्त करून कार्यक्रम संपन्न झाला.










Leave a Reply