Pimpri political News : महापालिका निवडणुकीत शिवसेना मुसंडी मारणार : शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर

Pimpri political News : महापालिका निवडणुकीत शिवसेना मुसंडी मारणार : शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर


Pckhabar- पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत शिवसेनेला पोषक आणि अनुकूल वातावरण आहे. शिवसेनेचे निष्ठावान शिवसैनिक मैदानात उतरणार असून, निवडणूक रणांगणात ते जोरदार मुसंडी मारतील सत्तेची समीकरणे शिवसेनेच्या हाती असतील, असा विश्वास शिवसेना उपनेते, पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर यांनी व्यक्त केला.

शिवसेना भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने ५१ ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान शिवसेनाप्रमुखांची प्रतिमा आणि शाल देऊन करण्यात आला. त्यावेळी रवींद्र मिर्लेकर बोलत होते. शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव-पाटील, महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख वैशाली सूर्यवंशी, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, जिल्हा उपसंघटिका वैशाली मराठे, काशिनाथ पाटील, शहरप्रमुख सचिन भोसले, विधानसभाप्रमुख धनंजय आल्हाट, इरफान सय्यद, युवा सेनेचे अजिंक्य उबाळे आदी उपस्थित होते.

रवींद्र मिर्लेकर म्हणाले, शिवसैनिकांनी पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या विचारांची कास धरावी. आगामी महापालिकेच्या निवडणुकीत योग्य जबाबदारी पार पाडावी. शिवसेनेची बांधिलकी जनतेबरोबर आहे. शिवसेनेच्या हातात सत्ता आली तर विकासकामांचा डोंगर उभा केला जाईल. नगरसेवकांकडून विकासकामे करून घेण्याची जबाबदारी माझी असेल. स्वच्छ व पारदर्शक कारभारासाठी शिवसेना वचनबद्ध आहे.

आढळराव पाटील म्हणाले, आगामी महापालिका निवडणुकीत ‘घर तेथे शिवसेना’ अभियान राबवा. घराघरात शिवसेनेचे विचार पोहचवा. शिवसेना उमेदवार निवडून आणण्यासाठी एकत्रित प्रयत्न करावेत. कोरोना काळात शिवसैनिक जनतेची सेवा करण्यात अग्रेसर होते, असेही आढळराव पाटील यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *