Pimpri News : ई-वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन अन् सौरऊर्जा प्रकल्पही उभारणार

Pimpri News : ई-वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन अन् सौरऊर्जा प्रकल्पही उभारणार

Pckhabar- ई- वाहनांची संख्या वाढत आहे. वाढत्या इंधनाच्या दरामुळे वाहनचालकांकडून इलेक्ट्रिक वाहनांना पसंती मिळत असल्याचे दिसत आहे. इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेद्वारे शहरामध्ये विविध ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्याचे महापालिका प्रशासनाचे नियोजन आहे. महापालिका मुख्य कार्यालय, ८ प्रभाग कार्यालये, ८ जुनी आणि ४ नवीन रुग्णालये येथे हे चार्जिंग स्टेशन महापालिका प्रशासनाच्या वतीने उभारण्यात येणार आहेत. महापालिकेच्या सर्व इमारती, प्रभाग कार्यालये, मोशी कचरा डेपो आणि मैलाशुध्दीकरण प्रकल्प, शाळा, रुग्णालये आदी ठिकाणी सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित आहे.

महापालिका प्रशासनाने २०२२-२३ या
आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात ई-वाहनांच्या चार्जिंगसाठी चार्जिंग स्टेशन आणि पॉइंट उभारणे, सौरऊर्जा प्रकल्पांची उभारणी आदींचे नियोजन केले आहे. नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम (एन-कॅप) अंतर्गत त्यासाठी केंद्र सरकारकडून निधी मिळणार आहे. ‘एन- कॅप’ अंतर्गत शहर बृहद आराखड्यामध्ये (अॅक्शन प्लॅन) या बाबींचा समावेश आहे. टंडर अर्बन सोल्युशन संस्थेकडे हे काम देण्यात आले आहे. हा अॅक्शन प्लॅन राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. त्यांच्यामार्फत तो केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे. केंद्राची मंजुरी मिळाल्यानंतर प्रकल्पाबात पुढील कार्यवाही होऊ शकणार आहे.

ई-वाहनांच्या चार्जिंगसाठी महापालिका मुख्य कार्यालय, ८ प्रभाग कार्यालय, ८ जुनी आणि ४ नवीन रुग्णालये येथे ई-चार्जिंग स्टेशनची व्यवस्था करण्यात येणार आहे. महापालिकेच्या सर्व इमारती, ८ प्रभाग कार्यालये, १०५ प्राथमिक शाळा आणि १८ माध्यमिक शाळा, ८ जुनी आणि ४ नवीन रुग्णालये, मोशी कचरा डेपो, १४ मैलाशुध्दीकरण केंद्र आदी ठिकाणी सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *