Pimpri News : शहरातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी विशेष महासभेचे आयोजन करा; राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाची महापौरांकडे मागणी

Pimpri News : शहरातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी विशेष महासभेचे आयोजन करा; राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाची महापौरांकडे मागणी

Pckhabar- पिंपरी-चिंचवड महापालिकेची 18 फेब्रुवारीची महासभा शेवटची होती. परंतु, भाजपने ती सभा तहकूब करुन 17 मार्च रोजी ठेवली. 13 मार्च रोजी नगरसेवकांचा कार्यकाळ संपणार असल्याने 17 मार्च रोजीची सभा होऊ शकणार नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न, गेल्या पाच वर्षातील विकासकामांसह भ्रष्टाराच्या मुद्यांवर चर्चा करण्यासाठी विशेष महासभेचे आयोजन करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केली. महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार राष्ट्रवादीच्या स्थायी समितीतील चार सदस्यांनी विशेष सभा घेण्याची विनंती महापौरांना केली.

शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महापौर उषा ढोरे यांची आज (सोमवारी) भेट घेतली. विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, स्थायी समिती सदस्य राजू बनसोडे, प्रवीण भालेकर, पोर्णिमा सोनवणे, सुलक्षणा धर यांनी विशेष सभा बोलविण्याची मागणी केली. यावेळी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेवक मयूर कलाटे उपस्थित होते. राष्ट्रवादीचा 15 वर्षाचा विकास आणि भाजपच्या काळातील 5 वर्षाचा विकास यावर चर्चा करण्याचे आव्हान भाजपचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांनी दिले होते. त्यांचे आव्हान राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी स्वीकारत एक पाऊल पुढे टाकले. महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार स्थायी समितीच्या चार सदस्यांना घेऊन विशेष महासभेचे आयोजन करण्याची विनंती महापौरांकडे केली. त्यामुळे आता महापौर ढोरे म्हणजेच पर्यायाने भाजप विशेष सभा बोलविणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महापौरांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महापालिकेची फेब्रुवारी महिन्याची सर्वसाधारण सभा दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली वाहून 17 मार्च पर्यंत तहकूब केली. परंतु, महापालिकेच्या सदस्यांची मुदत 13 मार्च रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे महापालिका विसर्जित होईल आणि प्रशासक येऊ शकेल. त्यामुळे 17 मार्चची सभा होऊ शकणार नाही. 18 फेब्रुवारीची सभा विद्यमान नगरसेवकांची शेवटची महासभा ठरणारी असतानाही ती सभा घेण्यात आली नाही. त्यामुळे विशेष महासभा घेणे अत्यंत आवश्यक आहे.

गेल्या पाच वर्षातील विकास कामांसह इतर अनेक मुद्यांवर या सभेमध्ये चर्चा करणे अपेक्षित आहे. सध्या अनेक मुद्दे शहर पातळीवर चर्चेत असल्याने महापालिकेची नाहक बदनामी होत आहे. या मुद्यांवर चर्चा घडून आल्यास नागरिकांमध्ये असलेले समज-गैरसमज दूर होण्यास मदत होईल. विशेषकरुन भ्रष्टाचाराच्या मुद्यावर चर्चा व्हावी. सर्वसामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याचे शहरातील विकासकामांबाबतचे मुद्दे, भय, भ्रष्टाचार आणि विकास या मुद्यांवर देखील सर्वसाधारण सभेत चर्चा होणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे आपण आठवडाभरात विशेष महासभेचे आयोजन करावे अशी विनंती राष्ट्रवादीच्या स्थायी समितीतील चार सदस्यांनी महापौरांना केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *