Pimpri News : जगाला आनंद देण्यासाठी लिहा – ए.के.शेख

Pimpri News : जगाला आनंद देण्यासाठी लिहा – ए.के.शेख
शब्दधन काव्यमंच आयोजित ‘चला जाऊ ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी…’ उपक्रम

Pckhabar- “साहित्यिकांना परमेश्वराचे वरदान असते म्हणून त्यांनी जगाला आनंद देण्यासाठी लिहिले पाहिजे!” असे विचार ज्येष्ठ साहित्यिक ए.के.शेख यांनी सदाशिव कॉलनी, थेरगाव येथे रविवार, दिनांक २० फेब्रुवारी २०२२ रोजी व्यक्त केले. शब्दधन काव्यमंच आयोजित ‘चला जाऊ ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी…’ या उपक्रमांतर्गत ज्येष्ठ कवी आय.के.शेख यांचा महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिक ए.के.शेख यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि ग्रंथ प्रदान करून हृद्य सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत चौगुले यांनी आय.के.शेख यांच्या ‘संस्कृती महाराष्ट्राची’ या कवितेचे रसग्रहण करताना, “सुगमता आणि प्रासादिकता हे आय.के.शेख यांच्या काव्यलेखनाचे वैशिष्ट्य असून सुमारे दोन हजार वर्षांची प्राचीन परंपरा असलेल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीची उदात्तता अन् सद्यःस्थितीतील विसंगती त्यांनी कवितेतून चपखलपणे मांडली आहे. या संस्कृतीवर, मातीवर असलेल्या निस्सीम प्रेमातून हे वास्तव मांडताना साहित्यिकाला जात आणि धर्म नसतो, हे त्यांनी अधोरेखित केले आहे!” अशी समीक्षा केली. ज्येष्ठ कवयित्री शोभा जोशी आणि प्रदीप गांधलीकर यांनी आपल्या मनोगतातून आय.के.शेख यांच्या साहित्यिक व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये विशद केली. आय.के.शेख यांच्या सहधर्मचारिणी आणि निवृत्त शैक्षणिक केंद्रप्रमुख जयनूल शेख यांनी त्यांच्या साहचर्यातील आठवणींना उजाळा दिला; तर आय.के.शेख यांनी कृतज्ञतापर मनोगत व्यक्त केले. या सत्कार सोहळ्यात पिंपरी-चिंचवडमधील अशोक गोरे, राधाबाई वाघमारे, सुहास घुमरे, शामराव सरकाळे, फुलवती जगताप, विजया नागटिळक, चंद्रकांत धस, नीलेश शेंबेकर, निशिकांत गुमास्ते, आनंद मुळूक, मधुश्री ओव्हाळ, अंतरा देशपांडे, संगीता जोशी इत्यादी साहित्यिक उपस्थित होते. शब्दधन काव्यमंचाचे संस्थापक-अध्यक्ष सुरेश कंक यांनी आपल्या प्रास्ताविकातून, “साहित्यिकांचा एकोपा अबाधित राखून शहरातील ज्येष्ठ साहित्यिकांचा सन्मान करणे हे ‘शब्दधन’चे नैतिक उद्दिष्ट आहे!” अशी भावना व्यक्त केली. ए.के.शेख पुढे म्हणाले की, “अल्प उत्पन्नात समाधानी असणारे वडील आणि निरक्षर आई यांनी आमच्यावर साहित्याचे संस्कार केले. जगात खूप प्रकारचे दु:ख आहे म्हणून साहित्यिकांनी प्रासादिक अन् मांगल्यपूर्ण शब्दांचा वापर करून रसिकांच्या चेहऱ्यावर हसू फुलविले पाहिजे!” त्यांनी आय.के.शेख यांची,

“जीवन म्हणजे आंबा मधुर रसाचा आहे…
जाणे शेवट थांबा निश्चित त्याचा आहे!”

ही गझल सादर केली.
कार्यक्रमाच्या संयोजनात फरिदा शेख, साहिल शेख, जुनेद शेख, शरद काणेकर, रामचंद्र प्रधान, झुबेन शेख, जमीर शेख, जयश्री गुमास्ते, दिलीप ओव्हाळ यांनी परिश्रम घेतले. तानाजी एकोंडे यांनी सूत्रसंचालन केले. नंदकुमार कांबळे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *