Dehu News : शिवजयंतीच्या निमित्ताने देहूतील अभंग इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी सादर केले विविध सांस्कृतिक कलादर्शन

Dehu News : शिवजयंतीच्या निमित्ताने देहूतील अभंग इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी सादर केले विविध सांस्कृतिक कलादर्शन


Pckhabar- अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिवजयंती व मराठी राजभाषा दिनाचे निमित्ताने ‘महाराष्ट्राची लोकधारा’या विद्यार्थ्यांच्या विविध सांस्कृतिक कलादर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या प्राचार्या डॉ. कविता अय्यर मॅडम यांच्या हस्ते छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. महाराष्ट्रातील विविध लोककला व या लोककलांमधून मराठी भाषेची वेगवेगळी रुपे या कार्यक्रमातून दाखविण्याचा प्रयत्न केला गेला. भूपाळी, जात्यावरील ओव्या, वासुदेव, कृषिनिष्ठ शेतकरी, गोंधळ या लोककलांवर नृत्य सादर केले गेले. तसेच एकनाथी भारूड ‘विंचू चावला’ ने उपस्थित पालकांची मने जिंकली. पाळणागीत गाऊन छत्रपती शिवरायांचे पाळण्यात घालून नामकरण करण्यात आले.

इयत्ता तिसरीतील अथर्व फटांगडे या विद्यार्थ्याने सादर केलेल्या छत्रपती शिवाजीमहाराजांच्या महतीचा पोवाडा व शिवगर्जनेस टाळ्यांचा कडकडाट करत उपस्थित पालकांनी विशेष दाद दिली. महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी, ही संतपरंपरा, समाजसुधारक, साहित्यिक या सर्वांची दिंडी काढून ‘मी मराठी’ चा जागर करण्यात आला. जगद्गुरू संत तुकारामांच्या ‘विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म’ या अभंगावर कीर्तनही उभे केले. हे विश्वची माझे घर ही शिकवण यातून देण्यात आली. जगद्गुरू तुकोबाराय हे भक्तीचे प्रतिक… तर छत्रपती शिवराय हे शक्तीचे प्रतिक. तिसरीतील विद्यार्थ्यांनी भक्ती-शक्ती भेट सोहळा सादर केला. शाळेतील शिक्षकवृंदांनी नाशिक ढोलच्या तालावर लेझीम सादर केले.

या कार्यक्रमास पालक बहुसंख्येने उपस्थित होते. महाराष्ट्राची लोककला व लोकपरंपरेची ओघवत्या शैलीत महती सांगत कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सहशिक्षिका सौ. वृषाली आढाव मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन शिक्षिका सौ. प्रियंका चव्हाण मॅडम यांनी केले. कार्यक्रमाची सांगता संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पसायदानाने झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *