Pimpri Cirme News : मोहोळ – शेलार टोळीयुद्धप्रकरणी गुन्हा दाखल
पोलिसांना कारवाईबाबत महिनाभरानंतर आली जाग

Pckhabar-मुळशी तालुक्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ आणि विठ्ठल शेलार यांच्यात उडालेल्या टोळीयुद्धाच्या भडक्याबाबत हिंजवडी पोलिसांना महिनाभराने जाग आली आहे. व्यावसायिक वादातून म्हाळुंगे येथील एकाला पिस्तुलाचा धाक दाखवून धमकी दिल्याच्या कारणावरून मोहोळ टोळीने एक महिन्यापूर्वी म्हाळुंगे येथील राधा चौकातून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांवर दगडफेक केली, तसेच कुंड्या फेकून दहशत निर्माण केल्याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात शरद मोहोळ याच्यासह दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
फौजदार समाधान कदम यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कुख्यात गुंड शरद हिरामण मोहोळ (रा. माउलीनगर, सुतारदरा, कोथरूड), आलोक शिवाजी भालेराव (रा. वडाचीवाडी, पौड रोड, कोथरूड), मल्हारी मसुगडे (रा. ताजणे वस्ती कॉर्नर, माळवाडी, पुनावळे), सिद्धेश बाहू हगवणे (वय ३०, रा.म्हाळुंगे) व त्याच्या इतर ५ ते ६ साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ८ जानेवारी रोजी मध्यरात्री घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंड विठ्ठल शेलार याने हगवणे याला पिस्तुलाचा धाक दाखवून धमकी दिली होती. त्यामुळे शरद मोहोळच्या सांगण्यावरून सिद्धेश हगवणे, मल्हारी मसुगडे, आलोक भालेराव व त्यांच्या साथीदारांनी विठ्ठल शेलार व त्याचे साथीदार राधा चौकात असल्याचे समजून तेथे आले. त्यावेळी तेथून एक गाडी जात होती. ती शेलार याची असल्याचे समजून त्यांनी गाडीतून पळून जाणाऱ्या साथीदारांवर दगड व कुंड्या फेकून मारून गंभीर हल्ला केला. तसेच, राधा हॉटेल व तेथून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या जिवाची पर्वा न करता रोडवर दगडफेक केली. वाहनांच्या काचा फोडल्या. हा गंभीर प्रकार घडल्यांनतर हिंजवडी पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून कारवाई करणे गरजेचे होते. मात्र, पोलीस हातावर हात ठेवून गप्प बसले. अखेर, महिनाभरानंतर पोलिसांना जाग आली आणि त्यांनी गुन्हा दाखल केला. हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.










Leave a Reply