Dehu political Exclusive News : इतिहासात नोंद…सासू पहिल्या महिला सरपंच तर सूनबाई पहिल्या नगराध्यक्षा…!


Pckhabar- नव्याने निर्माण झालेल्या श्रीक्षेत्र देहू नगरपंचायतीच्या प्रथम नगराध्यक्ष होण्याचा बहुमान राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्मिता शैलेश चव्हाण यांना मिळाला आहे. तर चव्हाण यांच्या सासू कै. सूमन गोपाळ चव्हाण यांना देहू ग्रामपंचायतच्या पहिल्या महिला सरपंच होण्याचा मान मिळाला होता. त्यामुळे सासू-सूनांना मिळालेल्या या महत्त्वाच्या पदाचा हा योगायोग देहू पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरला असून इतिहासात यांची नोंद झाली..!

17 सदस्य संख्या असलेल्या तीर्थक्षेत्र देहू नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 14, दोन अपक्ष, एक भाजपचा नगरसेवक निवडून आला असून दोन्ही अपक्ष नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. त्यानंतर नगराध्यक्षपद हे अनुसूचित जातीच्या (एससी) प्रवर्गातील महिलेसाठी राखीव निघाले. या प्रवर्गात
स्मिता चव्हाण या प्रभाग क्रमांक 9 तर  पूजा दिवटे या प्रभाग क्रमांक 3 मधून नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. मात्र, मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील शेळके यांनी चव्हाण यांच्या नावाला पसंती दिली.

”ज्ञानदेवे रचला पाया..
तुका झालासी कळस..!” या उक्तीप्रमाणे स्मिता चव्हाण यांच्या सासूबाई कै. सुमन गोपाळ चव्हाण यांना तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री कै. रामकृष्ण मोरे सरांनी देहू ग्रामपंचायतच्या पहिल्या महिला सरपंच होण्याचा मान दिला होता.  त्या 1999 ते 2004 या कालावधीत सरपंच होत्या. कै. मोरे सरांनी रचलेल्या पायावर मावळ विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील अण्णा शेळके यांनी त्यांच्या सूनबाई स्मिता शैलेश चव्हाण यांना देहू नगरपंचायतीच्या पहिल्या महिला नगराध्यक्षा होण्याचा बहुमान देऊन कळस चढविला आहे.

दरम्यान, सासू कै. सुमन चव्हाण यांच्यानंतर त्यांच्या सूनबाई स्मिता चव्हाण या त्यांचा राजकीय वारसा चालवत आहेत. त्यांना बिनविरोध नगराध्यक्ष होण्याचा बहुमान मिळाल्याने देहू नगरपंचायतीच्या इतिहासात याची नोंद झाली आहे. तसेच या योगायोगाची  देहू पंचक्रोशीतील राजकीय वर्तुळात जोरदार
चर्चा रंगली आहे.

याबाबत प्रथम नगराध्यक्षा स्मिता शैलेश चव्हाण म्हणाल्या”मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके यांनी आपणास प्रथम नगराध्यक्ष होण्याचा बहुमान दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते. तसेच अण्णांच्या मार्गदर्शनाखाली देहूकरांसाठी मुलभूत सुविधा आणि देहूचा सर्वांगीण विकास करण्याचा आपला प्रयत्न असणार आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *