Dehu Election News : देहू नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्मिता चव्हाण, उपनगराध्यक्षपदी रसिका स्वप्नील काळोखे यांना संधी

Pckhabar- नव्याने निर्माण झालेल्या तीर्थक्षेत्र देहू नगरपंचायतीच्या प्रथम नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्मिता चव्हाण यांना संधी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱ्या उमेदवार पूजा दिवटे यांचा अर्ज काही वेळापूर्वी माघारी घेतला असल्याने चव्हाण यांच्या नावाची उद्या (शुक्रवार) घोषणा होणे औपचारिकता बाकी आहे.
दरम्यान, उद्याच उपनगराध्यक्षची निवड होणार आहे. मात्र, मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील शेळके यांनी सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेल्या रसिका स्वप्नील काळोखे यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे त्यांच्याही नावाची घोषणा होण्याची फक्त औपचारिकता बाकी आहे.
देहू नगरपंचायतीच्या प्रथम नगराध्यक्ष पदासाठी अनुसूचित जाती महिलेसाठी आरक्षण राखीव झाले होते.
अनुसूचित जाती या प्रवर्गातून प्रभाग क्रमांक तीन मधून पूजा दिवटे आणि प्रभाग क्रमांक 9 मधून स्मिता चव्हाण या निवडून आल्या आहेत. प्रथम नगराध्यक्ष पद मिळविण्यासाठी दिवटे आणि चव्हाण यांच्यात जोरदार रस्सीखेच निर्माण झाली होती. मात्र, मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील शेळके यांनी चव्हाण यांच्या नावाला पसंती दिली आहे.
दरम्यान, देहू ग्रामपंचायतीचे रूपांतर होऊन प्रथमच झालेल्या नगरपंचायतीच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे 14, दोन अपक्ष, एक भाजपचा नगरसेवक निवडून आला आहे तर दोन्ही अपक्ष नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचाच नगरसेवक नगराध्यक्ष होणार हे निश्चित होते.










Leave a Reply