Article By Dr. Anjali mulke : आपलं जगणं आपल्या हातात…!

Article By Dr. Anjali mulke : आपलं जगणं आपल्या हातात…!

डॉ.अंजली मुळके

Pckhabar- आजकाल भौतिकाचा बोलबाला आहे..!
पैसा, प्रतिष्ठा, भौतिक सुखवस्तुत रमणारं, त्यालाच सर्वस्व मानणारं एक वेगळंच जग आहे..
त्यात जगणाऱ्या माणसांना, सर्व भौतिक सुखे पायाशी लोळण घेत असली तरीही, त्यातलं काही थोडं जरी मिळालं नाही की, हे जग आणि हे जगणं व्यर्थ वाटायला लागतं.. !
त्यांना आत्ता ही अमुक अमुक गोष्ट प्राप्त झाली नाही, म्हणून या जीवनात प्राप्त झालेली हरएक वस्तू गौण आणि मूल्यहीन वाटायला लागते..
कारण, त्या ठराविक क्षणी, त्या एखाद्या ठराविक इच्छेच्या प्राप्तीचा ध्यास त्यांच्या मनी असतो..
ती एखादीच गोष्ट मिळाली म्हणजेच माझं जगणं सार्थक आहे, असं ते समजायला लागतात..!

आणि बरं, ही गोष्ट समजा येनकेनप्रकारेण मिळाली देखील.. त्याचा आनंद कितीसा टिकतो..!?
काही क्षण, काही दिवस..
तरी मग पुढे आयुष्यात, त्याव्यतिरिक्त त्याला कोणत्या इतर गोष्टीची इच्छा, आसक्ती होणार नाहीच का..?
होणारच.. बिलकुल होणार..
माणूस भौतिकात रमला, की त्याचा एकामागून एक काहीतरी मिळवण्याचा ध्यास संपत नाही..
जितकं त्या भौतिकतेत गुंतत आणि गुरफटत जाईल, तितकं त्याला आयुष्यात अधिकाधिक असमाधान देखील आपसूकच मिळत जातं..

आणि मग, एखाद्या अशा गोष्टीची प्राप्ती झाली नाही, की, या असमाधानापोटी ते नैराश्याची पायरी हळूहळू नकळत चढत जातात..
आणि या नैराश्यात आस्ते आस्ते विरघळत जातात..
हे अशा प्रकारचं नैराश्य सहसा स्वतःहून ओढवलेलं असतं..

हजार गोष्टी असतांनादेखील, ही एक का नाही मिळाली, या विचाराचा भुंगा त्यांचा आसक्त असणारा मेंदू पोखरत जातो..
‘असंच असायला हवं..’
‘असं नको..’
‘असं का झालं..’ किंवा ‘असंच का झालं नाही..’ अशा तद्दन रिकाम्या विचारांत ते गुंतत जातात..
गुरफटून जातात..
हा गुंता मग त्यांना स्वतः सोडवता येत नाही..
म्हणून मग असे लोक, हे जगच सोडून देण्याचा अविचार करून बसतात..

त्यातल्या काही भाग्यवंतांना सहकारी, मित्र, प्रियजनांच्या समजुतीची साथ मिळते..
कुठे कोणाला या गुंत्यातून बाहेर निघण्याचा मार्ग कोणाच्या सहकार्याने मिळतो..

आणि ज्यांना अशी साथ मिळत नाही, त्यांना हे जगणं म्हणजे ओझं वाटायला लागतं..
एकटेपणाच्या आणि या विचारांच्या या ओझ्यातून मुक्त होण्याच्या विचारांकडे ते हळूहळू झुकायला लागतात..

पण त्यांच्या त्या जगाच्या दरवाजावरील पडदा बाजूला सारून, त्याच्या बाहेर एक साधं, पण सुंदर जग आहे, हे ते पाहत नाहीत..

तो दरवाजा, ती चौकट न ओलांडताच, त्या भौतिकतेत गुरफटून त्या व्यक्ती स्वतःच अंत पावतात झालं..😔
कित्येक उच्चशिक्षित आणि आयुष्यात तथाकथित ‘सेटल’ झालेल्या व्यक्ती आत्महत्या करतांना दिसतात.. स्वतःला संपवतांना दिसतात..!

हे झालं सुखवस्तू घरातील सर्व भौतिक सुखात लोळण घेत असलेल्या व्यक्तींच्या बाबतीत..

पण, असाही एक वर्ग मोठ्या प्रमाणात आपण बघतो, की, सुखाची फार साधी व्याख्या माहीत असते त्यांना..
“रोटी, कपडा और मकान..!”
बस्स..!

पण कित्येक गरिबीच्या गर्तेत जगत असलेल्या माणसांना, ह्या मूलभूत गरजा देखील भागवतांना आयुष्य पणाला लावावं लागतं..
भाकरीचा चंद्र पूर्ण करतांना कष्टाची परिसीमा गाठली तरीही “सुख” नावाची गोष्ट पदरात खचितच पडते..!

कष्टकऱ्यांच्या आयुष्यात, सहसा तसं पाहिलं तर समाधान दिसतं.. कष्टातून मिळवलेल्या कोरड्याच का होईना चटणी भाकरीला ती लोकं गोड मानून घेतात..
कष्टाने थकलेल्या शरीराला अन् मनाला, देह धरणीला टेकताच गाढ झोप लागते..
इथं श्रीमंतांसारखी झोपेची गोळी घ्यावी लागत नाही..

पण,,, इथेही पण येतो आहेच..

आयुष्याच्या किमान गरजा भागवतांना, आपल्या लेकरांना कपडा, शिक्षण आणि पोटभर पोटाला घालतांना, या लोकांना कित्येकांना कर्जाचा आधार घ्यावा लागतो..
उत्पन्न रामभरोसे असतं..
कर्जाचा डोंगर हळूहळू मोठा होत जातो..
नि एक दिवस या डोंगराचं शिखर आभाळात दिसेनासं झालं, की मग या गरीबाच्या गळ्याकडे फास ‘आ’ वासून येतो..!!😢

इथंही नैराश्य आहेच..!!
पण हे नैराश्य वरच्या सुखासीन व्यक्तीच्याप्रमाणे स्वनिर्मित नाही..
हे परिस्थिती निर्मित आहे..

प्रश्न असा येतो की, आत्महत्या का करतो माणूस..!!??
त्याला जगणं जमत नाही म्हणून नाही…
तर,
त्याच्या विशिष्ट विचारांच्या आणि विशिष्ट अपेक्षांच्या चौकटीत त्याचं जगणं बसत नाही म्हणून..
म्हणून तो हे जगणंच संपवतो..
यात तो स्वार्थ बघतो, असंच काहीसं म्हणावं लागेल..
स्वतःच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी, आपल्या मागे उरणाऱ्या आपल्या जिवाभावाच्या जीवांना आपण जन्मभरासाठी जीवाला चटका लावून जाणार, याचं भान देखील नसणं, म्हणजे स्वार्थच नाही का..!?

असं केल्याने मिळतं का हो, त्याच्या विचारातील समृद्ध जगणं..!?
मेल्यानंतर होते का त्याच्या अपेक्षांची ती चौकट पूर्ण..!!??

ती चौकट पूर्ण होणार तर नाहीच, पण उलट आयुष्यात आपण ज्या घराचा आधार असू, त्या घराचे वासे गळून पडतात..
आपल्याला आधार मानणाऱ्या कोणाच्यातरी दाराची चौकट मोडते.. कवाडं उन्मळून पडतात..!

जाणारे जातात बापडे..
पण जातांना आपल्या नात्याच्या धाग्यांचा गुंता, ते मागे तसाच सोडून जातात.. मागे राहिलेल्या जगणाऱ्या लोकांना हा गुंता सोडवतांना कित्येक कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागतं..
नि अशावेळी, त्यातील काही धागे तुटतात देखील..

जाणारा जातांना मागे उरलेल्या प्रियजनांच्या आयुष्याला शेवटपर्यंत पुरणाऱ्या भळभळत्या जखमा देऊन जातो..

का होतं असं..!?
नैराश्याने..??
आहे काय हे नेमकं..!?

नैराश्य.. मानलं तर राक्षस, अन् नाही तर कसपट..

त्या राक्षसाचा बागुलबुवा करायचा की त्याला कसपटाप्रमाणे अलगद परतवून लावायचं, ते आपल्या प्रयत्नांवर अवलंबून आहे..!

आयुष्यात कितीही यशाची उंची गाठली, पद प्रतिष्ठा मिळवली, पैसा मिळवला, तरीही, प्रत्येक व्यक्तीला एका आऊटलेट ची गरज असते..
म्हणजे मनातील सुखदुःख, भावना, साठलेलं मळभ कुठेतरी रितं करण्याचं एक ठिकाण असण्याची गरज असते..
पाठीवरून कौतुकाची थाप नसली तरी आपुलकीचा, प्रेमळ हात फिरवायला कोणीतरी हवं असतं..

पैसा असो, वा नसो..
समोर असणाऱ्या कसल्याही बिकट परिस्थितीत सोबत असण्याची शाश्वती आणि आश्वस्त हात हवा असतो..

पण हे सगळं प्रत्येकाला मिळेलच असं नाही..!
मग..?

खरं तर, आपल्या अपेक्षांच्या चौकटी देखील मर्यादित ठेवल्या, की त्या चौकटीची कवाडं कोलमडून जात नाहीत..
अशा अपेक्षांचा हव्यास सीमित असला की, त्या चौकटीचं दार बंद न राहता, जगासोबत आपसूक संवाद होत जातो..
आणि एकदा का स्वमग्नतेतून या जगात डोकावलं, की, ह्या जगात आपल्या असलेल्या कणाहून लहान अस्तित्वाची जाणीव होऊन, या जगण्याप्रति आपोआप कुतूहल आणि उत्साह वाटू लागतो..!

बोलावं..
व्यक्त व्हावं..
कुठेतरी शब्द मांडले तर त्यातून वाटा मिळत जातात..

*”तुका म्हणे होय मनासी संवाद।*
*आपुलाचि वाद आपुल्यासी।।”*

संत थोरवी काही उगाच गायल्या जात नाही..
त्या काळी देखील जगतांना आलेल्या अडचणींना तोंड देतांना जगद्गुरू तुकोबारायांनी सांगितलं होतं, की, स्वतः स्वतःशी संवाद साधा..
कुटुंबातील आप्तजनांशी बोलते व्हा..
आपलं सांगा, त्यांचं ऐका..

एकंदर, संवाद महत्वाचा आहे..!

तसंच, व्यक्ततेसोबतच, व्यस्तही असायला हवं..
आपल्या आवडीची कामं करत हे आयुष्य जगतांना जगण्याचा आनंद मिळत जातो.. जगण्यालाही अर्थ मिळत जातो..!

नकारात्मक विचारांच्या काहुराला निर्माण होण्याआधीच, स्वतःला कामामध्ये गुंतवून आणि आपल्या प्रियजनांच्या सहवासाला वाहून घेतलं, म्हणजे ह्या राक्षसी विचारांची शृंखला आपोआप तूटते.. आणि डोकं आणि मन मोकळं झालं की माणूस अगदी कसल्याही खडतर आयुष्याला निडरपणे सामोरे जाऊ शकतो..!

मनुष्यजन्माइतकं सुंदर वरदान झुगारून देऊन आपण त्या विधात्याचा अपमर्द करतोय..!

जगणं आव्हान का व्हावं..!?
काही गोष्टी मिळाल्या नाही, म्हणून जगणं व्यर्थ व्हावं का..?
प्रयत्न न करता, तलवार न उचलता रणांगण सोडलं म्हणजे विजयश्री प्राप्त होते का..?
आणि मग मला विजय मिळाला नाही, म्हणून जगण्यावर घाला घालणं योग्य आहे का..?
स्वतः कसं जगायचं, स्वतःचं नैतिक आत्मिक समाधान कशात आहे, तसं जगावं..
एकदा आत्महत्येसारखी चूक केली, की, ती चूक कोणामुळे झाली, कोणा व्यक्ती वा परिस्थितीमुळे झाली, ह्याला काही अर्थ उरत नाही..
चूक ती चूकच..!
आणि ही चूक सुधारण्याची संधी पुन्हा मिळत नसते..!

जगणं आव्हान असणं की ते सहज असणं हे सर्वस्वी आपल्या हातात आहे..!
आव्हानं आहेत म्हणून भ्याडपणे आयुष्य संपवायचं, की, आव्हानांना स्वीकारत जगण्याचा प्रवास आनंदाने पार करायचा ते आपणच ठरवावं..

संघर्षातून फुलं निर्माण करायची..
की, त्या संघर्षाला नकारात्मक घेऊन त्याला आपल्यावर स्वार होऊ द्यायचं..!?

आपलं जगणं आपल्या हातात..!!

डॉ. अंजली मुळके

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *