U19 World Cup News : युवा टीम इंडियाने रचला इतिहास!, इंग्लंडला पराभूत करत भारताने पाचव्यांदा जिंकला अंडर 19 वर्ल्ड कप

U19 World Cup News : युवा टीम इंडियाने रचला इतिहास!, इंग्लंडला पराभूत करत भारताने पाचव्यांदा जिंकला अंडर 19 वर्ल्ड कप

Pckhabar- वेस्ट इंडीजमधील आँटिगाच्या मैदानात यश धूलच्या नेतृत्वाखालील युवा टीम इंडियाने इतिहास रचला आहे. बलाढ्य इंग्लंड संघाला पराभूत करत भारताने पाचव्यांदा अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम करुन दाखवला.

इंग्लंडचा कर्णधार टॉम प्रेस्टनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय गोलंदाजांनी त्याचा निर्णय फोल ठरवला. रवी कुमारने सामन्याच्या सुरुवातीलाच संघाला ठराविक अंतराने दोन विकेट्स मिळवून दिल्या. राज बावाच्या बॉलिंगसमोर इंग्लंडची बॅटिंग गडगडली आणि त्यांचा 189 रनवर ऑल आऊट झाला. राज बावाने 9.5 ओव्हरमध्ये 31 रन देऊन 5 विकेट घेतल्या. तर डावखुरा फास्ट बॉलर रवी कुमारने 9 ओव्हरमध्ये 34 रन देऊन 4 विकेट मिळवल्या. कौशल तांबेलाही एक विकेट घेण्यात यश आलं.

दरम्यान, 190 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. पहिल्या षटकात संघाचे आणि वैयक्तिक खाते न उघडता रघुवंशीच्या रुपात भारताला पहिला धक्का बसला. त्यानंतर उपकर्णधार शेख राशीदनं सलामीवर हरनूर सिंगच्या साथीनं दुसऱ्या विकेटसाठी 49 धावांची भागीदारी केली. या भागीदारीनं भारतीय संघाच्या आशा जिंवत केल्या. उप कर्णधार शेख राशीदनं स्पर्धेतील सलग दुसऱ्या अर्धशतक ठोकले. त्यानंतर निशांत सिंधूने अष्टपैलू राज बावाच्या साथीने भारतीय संघाला विजयाच्या समीप नेलं. दोघांनी अर्धशतकी भागीदारी रचली. 47 व्या षटकात भारतीय संघाने कौशक तांबेच्या रुपात सहावी विकेट गमावली. 22 चेंडूत 14 धावांची गरज असताना निशांतची साथ द्यायला यष्टीरक्षक फलंदाज दिनेश बाना क्रिजमध्ये आला.

18 चेंडूत 12 धावांची गरज असताना 48 व्या षटकातील पहिल्या निशांतने खणखणीत चौकार खेचला. दुसऱ्या चेंडूवर एक धाव पूर्ण करत त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर दिनेश बानाने सलग दोन षटकार मारले. त्याने उत्तुंग षटकार मारून भारतीय संघाचा विजय साकारला. त्याचे हे दोन षटकार धोनीची आठवण करुन देणारे ठरले.

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने 2011 च्या वर्ल्डकपमध्ये असाच उत्तुंग षटकार खेचून भारतीय संघाला वर्ल्ड कप जिंकून दिला होता.

दरम्यान, भारतीय युवा संघाने यापुर्वी 2000, 2008, 2012,2018 आणि आता 2022 मध्ये अशा पाच वेळा वर्ल्डकप जिंकला आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *