Pimpri News : कोरोना मृतांच्या नातेवाईकांचे 640 अनुदान अर्ज नाकारले

Pimpri News : कोरोना मृतांच्या नातेवाईकांचे 640 अनुदान अर्ज नाकारले

कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याचा महापालिका प्रशासनाचा दावा

Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या दोन वर्षांत तब्बल साडेतीन लाख नागरिकांना कोरोनाची लागण झाली, तर या कालावधीमध्ये अनेकांनी कोरोनाने प्राण गमावले. घरातील कर्त्या माणसाचा मृत्यू झाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले. त्यांना सावरण्यासाठी मदत व्हावी, यासाठी राज्य सरकारच्या वतीने 50 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात येत आहे. मात्र, तब्बल 640 जणांचे अर्ज बाद करून मृतांच्या नातेवाईकांना महापालिका प्रशासनाने अडचणीत आणले आहे.

कोरोनाने मृत्यू झालेल्या नातेवाईकास आर्थिक मदतीची अर्जप्रक्रिया डिसेंबर 2021 पासून सुरू झाली. मदतीची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मृत्यू झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी राज्य शासनाने विकसित केलेल्या वेब पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावयाचे होते. पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात 6 हजार 59 मृत रुग्णांच्या नातेवाईकांनी अर्ज केले होते. त्यापैकी 640 जणांचे अर्ज बाद झाले असल्याचे समोर आले आहे.

नातेवाईकांना आर्थिक मदत मिळण्यासाठी राज्य शासनाने जाचक अटी ठेवल्या नव्हत्या. तरीही एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्ज बाद झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अर्ज करत असताना कागदपत्रांमध्ये झालेली चूक आणि आधार नंबर चुकल्याने अर्ज बाद झाले असावेत, अशी शक्यता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. हा अर्ज दाखल करताना अर्जदाराने मृत पावलेल्या व्यक्तीचा दिलेला आधार उपशील सार्वजनिक आरोग्य विभागाकडे कोरोनाने मृत्यू पावलेल्यांचा डेटा उपलब्ध असलेल्या आधार क्रमांकाशी जुळवला जातो. आधार क्रमांक जुळल्यास हा अर्ज संगणकीय प्रणालीवर आपोआप स्वीकृत करण्याची कार्यवाही करण्यात येते. मात्र, तसे झाले नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडे हे अर्ज संगणकीय प्रणालीवर पाठविण्यात येतात. असे 640 अर्ज महापालिकेकडे पाठविण्यात आले आहेत.

महापालिका आणि ग्रामीण भागातून 6 हजार 59 अर्ज करण्यात आले आहेत. त्यांपैकी 640 अर्ज बाद झाले आहेत. ज्यांचे अर्ज बाद झाले आहेत, त्यांना दुरुस्ती करण्यासाठी संधी दिली जाणार असून, त्यांना एक तारीख देऊन प्रत्यक्ष बोलावण्यात येणार आहेत. त्यासाठी पाच जणांचीकमिटी स्थापन करण्यात येणार आहे.
डॉ. लक्ष्मण गोफणे,
सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी महापालिका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *