Election News : प्रभागनिहाय मतदार यादी विभाजनाचे काम सुरु
२८ फेब्रुवारीपर्यंत काम पूर्ण करा; राज्य निवडणूक आयोगाचे आदेश
Pckhabar- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध झाल्यानंतर आता प्रभागनिहाय मतदार यादी विभाजनाचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणूक प्रभागांच्या भौगोलिक सीमांच्या प्रारूपानुसार मतदार यादी विभाजनाचे काम आज (शुक्रवार)पासून सुरू करून २८ फेब्रुवारी २२ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहेत. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेला वेग आला असून मार्चमध्ये आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे.
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता केंद्रीय निवडणूक आयोगाने १ जानेवारी २२ या अर्हता दिनांकावर ५ जानेवारी २२ रोजी प्रसिद्ध केलेली विधानसभेची मतदार यादी जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त करून घ्यावी. ही मतदार यादी, मूळ यादी आणि पुरवणी या स्वरूपात प्राप्त होईल. पुरवणी मतदार यादीमध्ये जी नावे वगळण्यात आल्याचे नमूद केले असेल त्या नावांसमोर मूळ मतदार यादीत वगळल्याचा शिक्का असेल. तो लक्षात घेऊन वगळणे आवश्यक आहे. असा शिक्का नसल्यास पुरवणी मतदार यादीवरून तपासून मूळ मतदार यादीवर तसा शिक्का मारण्यात यावा, असे नमूद केले आहे.
मूळ मतदार यादी आणि पुरवणी यादी या दोन्ही मतदार याद्यांसह प्रभागनिहाय विभाजन कराव्यात. मतदार यादीचे निवडणूक प्रभागनिहाय विभाजन करण्याची प्रक्रिया २८ फेब्रुवारी २२ पर्यंत पूर्ण करावी. निवडणूक प्रभागांच्या भौगोलिक सीमा अंतिमरीत्या प्रसिद्ध झाल्यानंतर हद्दीमध्ये झालेल्या बदलांच्या अनुषंगाने मतदार यादीच्या विभाजनामध्ये योग्य त्या दुरुस्त्या कराव्यात, असेही निर्देश आहेत. मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा कार्यक्रम स्वतंत्ररीत्या देण्यात येईल, असेही राज्य निवडणूक आयोगाने कळविले आहे.
शहरात ६७ हजार २७६ नवमतदार वाढले
आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने १ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२१ या कालावधीत मतदान नोंदणी अभियान राबविले होते. पिंपरी चिंचवड आणि भोसरी या ३ विधानसभा मतदारसंघांत नव्या मतदारांची मोठ्या प्रमाणात नोंद झाली आहे. त्यामुळे तीनही मतदारसंघांत एकूण ६७ हजार २७६ मतदारांची वाढ झाली आहे. या मतदारसंघांत एकूण मतदारांची संख्या १४ लाख ३२ हजार ३४० झाली आहे. पिंपरी मतदारसंघांत ३ लाख ६८ हजार ८०२, चिंचवडमध्ये ५ लाख ६४ हजार ९९५ आणि भोसरी मतदारसंघात ४ लाख ९८ हजार ५४३ मतदार आहेत. तीनही मतदारसंघांत एकूण १४ लाख ३२ हजार ३४० मतदार आहेत.
संगणकप्रणालीचा वापर करून मतदार यादी तयार करण्यासाठी कंट्रोल चार्ट तयार करणे, त्याद्वारे मतदार यादीचे विभाजन करणे या कामांसाठी राज्य निवडणूक आयागोकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी तांत्रिक स्वरूपाचे काम करणारे कर्मचारी आणि अधिकारी यांची नियुक्ती करून त्यांची नावे राज्य निवडणूक आयोगास ८ फेब्रुवारीपर्यंत कळवावी, असेही आदेश आहेत. प्रशिक्षणामध्ये दिलेल्या सूचनांनुसार राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर कंट्रोल चार्ट अपलोड करून प्रारूप मतदार यादी तयार करता येईल. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा कार्यक्रम स्वतंत्ररीत्या देण्यात येणार आहे.










Leave a Reply