Sad News: मावळ लोकसभा मतदारसंघाचे पहिले खासदार गजानन बाबर यांचे निधन

Sad News: मावळ लोकसभा मतदारसंघाचे पहिले खासदार गजानन बाबर यांचे निधन
Pckhabar- मावळ लोकसभा मतदारसंघाचे पहिले खासदार गजानन बाबर यांचे आज ( बुधवार) काही वेळापूर्वी रूग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. ते 78 वर्षांचे होते.

बाबर यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

बाबर यांनी तीन वेळा नगरसेवकपद, तत्कालीन हवेली विधानसभा मतदारसंघाचे दोन वेळा प्रतिनिधित्व केले आहे. त्यानंतर मावळ लोकसभा मतदारसंघ 2009 मध्ये अस्तित्वात आल्यानंतर बाबर शिवसेनेच्या तिकीटावर खासदार झाले होते. 2014 मध्ये शिवसेनेने खासदारकीचे तिकीट नाकारल्या नंतर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला होता. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, त्यांनी काही वर्षांनी पुन्हा स्वगृही शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता.

बाबर यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी ११ वाजता निगडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांचे बंधू मधुकर बाबर यांनी सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी राजश्री, उद्योजक धीरज आणि सुरज ही दोन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक मधुकर बाबर, प्रकाश बाबर हे त्यांचे धाकटे बंधू तर, माजी नगरसेविका शारदा बाबर या भावजयी होत.

पिंपरी चिंचवड शहरात शिवसेनेच्या स्थापनेपासून संघटना रुजविण्यापर्यंत बाबर यांचे मोठे योगदान होते. शहरात घरमालक आणि भाडेकरू असे वाद कायम होत असतं. त्यावर तोडगा काढण्यासाठी म्हणून बाबर यांनी शिवसेनेच्या मदतीने भाडेकरूंसाठी संघटना स्थापन केली होती. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते काळभोरनगर येथे शिवसेनेची प्रथम शाखा त्यांनी स्थापन केली.

दिवंगत बाबर यांच्याबाबत

पिंपरी चिंचवड महापालिकेचे तीन वेळा नगरसेवक
हवेली विधानसभा मतदारसंघातून सलग दोनवेळा शिवसेनेचे आमदार
मावळ लोकसभा मतदारसंघाचे प्रथम शिवसेना खासदार
पिंपरी चिंचवड व्यापारी संघटनेचे गेली २५ वर्षे अध्यक्ष
सातार जिल्ह्यातील भुईंज येथील किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे गेली १५ वर्षे उपाध्यक्ष

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *