Big Crime News : कापड व्यावसायिकाकडून खंडणी उकळणारे भाजपचे माजी उपमहापौर, विद्यमान नगरसेवक केशव घोळवे यांना अटक
Pckhabar- कापड व्यावसायिकाकडून खंडणी उकळणारे भाजपचे माजी उपमहापौर, विद्यमान नगरसेवक, कामगार नेते केशव घोळवे यांच्यासह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलिसांनी घोळवे यांना मध्यरात्री अटक केली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
घोळवे हे संभाजीनगर प्रभागातून निवडणूक आले आहेत. ते भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात.
याप्रकरणी मोहम्मद तय्यब अली शेख (वय-45, रा. शास्त्रीनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार भाजपचे नगरसेवक घोळवे यांच्यासह गुड्डू उर्फ प्रमोद यादव, घनश्याम यादव, मलका यादव, हसरत अली शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीत कपड्याचे नेपाळी मार्केट आहे. मार्केटची जागा मेट्रो प्रकल्पात जाणार आहे. या जागेला पर्यायी जागा म्हणून व्यापाऱ्यांना 100 गाळे मिळणार आहेत. त्यानंतरही आरोपींनी संगनमत करून 2019 पासून फिर्यादी आणि इतर व्यापाऱ्यांना महापालिकेकडून गाळे मिळवून देण्याचे आश्वासन दिले. तसेच भाजपा कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश या संघटनेमार्फत दरवर्षी 1200 रूपयांची पावती करण्यास भाग पाडले. तसेच शासनाकडून गाळे मिळवून देण्याच्या बहाण्याने फिर्यादी शेखकडून 55 हजार रुपयांची खंडणी घेतली. त्यानंतरही आरोपींनी फिर्यादी शेखकडे 1 लाख रुपयांची मागणी केली. शेख यांनी पैसे देण्यास विरोध केल्यानंतर आरोपींनी फिर्यादीला जिवे मारण्याची धमकी दिली.
दरम्यान, यापूर्वी देखील कंत्राटदाराला लाच मागितल्याप्रकरणी पिंपरी- चिंचवड महापालिकेतील भारतीय जनता पक्षाचे स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांना एसीबीने अटक केली होती. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी भाजपची मोठ्या प्रमाणात नाचक्की झाली आहे.










Leave a Reply