Pimpri Crime News : सायबर प्रशिक्षण घेतलेल्या पोलीस शिपायानेच केले अपहरण

Pimpri Crime News : सायबर प्रशिक्षण घेतलेल्या पोलीस शिपायानेच केले अपहरण

300 कोटींच्या बिटकॉइनसह आठ लाखांच्या खंडणीची केली मागणी ; पोलिसासह आठ जण गजाआड

Pckhabar- सायबर क्राईम रोखण्यासाठी प्रशिक्षण घेतलेल्या पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस शिपायानेच त्याच्या साथीदारांसोबत मिळून एकाचे अपहरण केले. त्याच्याकडे बिटकॉइनसह आठ लाख रुपयांची मागणी केली. मात्र, पोलीस मागावर असल्याचे लक्षात येताच अपहृत व्यक्तीला त्यांनी सोडून दिले. मात्र, वाकड पोलिसांनी कसून तपास करीत अपहरणाचा मास्टर माईंड असलेल्या पोलीस शिपायासह आठ जणांना गजाआड केले.

दिलीप तुकाराम खंदारे (रा. भोसरी, मूळ – कोनाटी, ता. सिंदखेड राजा, जि. बुलढाणा) असे अटक केलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. त्याच्यासह सुनील राम शिंदे (रा. खारदांडा पश्चिम, मुंबई), वसंत श्यामराव चव्हाण (रा. नालासोपारा पूर्व, मुंबई), फ्रान्सिस टिमोटी डिसूझा (रा. कल्याण पश्चिम, जि. ठाणे), मयूर महेंद्र शिर्के (रा. खार पश्चिम, मुंबई), प्रदीप काशिनाथ काटे (रा. दापोडी), शिरीष चंद्रकांत खोत (रा. उलवे, नवी मुंबई), संजय उर्फ निकी राजेश बन्सल (रा. उलये, नवी मुंबई) यांना अटक करण्यात आली आहे. सात ते आठ आरोपींनी विनय सुंदरराव नाईक (रा. ताथवडे) यांचे १४ जानेवारी रोजी ताथवडे येथील एका हॉटेलमधून अपहरण केले होते. याप्रकरणी रफिक अल्लाउद्दीन सय्यद (वय ३८) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी तत्काळ दोन पथके तयार केली. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज गोळा केले. दरम्यान, पोलीस आपल्या मागावर असल्याची कुणकुण आरोपींना लागली. त्यांनी नाईक यांना वाकड भागात सोडले आणि पसार झाले.

नाईक यांच्याकडे केलेल्या चौकशीत आरोपींनी बिटकॉइन व आठ लाख रुपयांची मागणी केल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी आरोपींचा माग काढत मुंबई गाठली. तेथे चार जणांना ताब्यात घेत त्यांनी अपहरणासाठी वापरलेली मोटार पोलिसांनी जप्त केली. अटक आरोपींनी प्रदीप काटे आणि दिलीप खंदारे यांच्या सांगण्यावरून राजेश बन्सल आणि शिरीष खोत यांच्यासोबत मिळून हा गुन्हा केल्याची कबुली दिली. नाईक यांचे अपहरण करून त्यांना अलिबाग येथील एका हॉटेलमध्ये डांबून ठेवून त्यांच्याकडे आठ लाख रुपयांची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर अन्य तिघांना पोलिसांनी अटक केली. या प्रकरणाचा मास्टरमाइंड दिलीप खंदारे असल्याचे आरोपींनी सांगितले. फौजदार गणेश तोरगल तपास करीत आहेत.

३०० कोटींचे बिटकॉइन अन् अपहरणाचा डाव

दिलीप खंदारे हा पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात पोलीस शिपाई पदावर कार्यरत असल्याचे तसेच सध्या नोकरीवर गैरहजर असल्याचे तपासात समोर आले. पूर्वी पुणे शहर पोलीस दलाच्या सायबर विभागात कार्यरत असताना त्याने सेवाअंतर्गत ऑफिस ऑटोमेशन, सायबर गुन्हे प्रणाली, अॅडव्हान्स सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेशन टेक्नॉलॉजी, बेसिक ऑफ हार्डवेअर अॅण्ड नेटवर्क इन्फॉरमेशन, मोबाईल फॉरेन्सिक असे कोर्स केले आहेत. तो सायबर क्राईम विभाग पुणे शहर येथे नेमणुकीस असताना त्याला विनय नाईकांकडे ३०० कोटींची बिटकॉईन ही क्रिप्टो करन्सी असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर त्याने इतर साथीदारांसह नाईक यांचे अपहरण करून पैसे उकळण्याचा डाव आखला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *