Article By Dr. Ankush Jadhav : आयुर्वेदिक औषधे केव्हा व कशी घ्यावीत?
Pckhabar- भारतात आयुर्वेद चिकित्सा पद्धत पूर्वीपासूनच प्रचलित असून लोक नेहमीच्या आजारांसाठी तसेच अर्वाचीन चिकित्सा पद्धतीने न बऱ्या आजारांसाठी या चिकित्सेचा लाभ घेतात.
कोरोनाच्या महासाथीत सर्वच आयुष चिकित्सापद्धतींना महत्व आहे,त्यात ही आयुर्वेदा ची भूमिका महत्वपूर्ण आहे. १९७० मध्ये भारतात आयुष चिकित्सेचा वापर ६६ टक्के लोक करीत होते हे प्रमाण आता८०टक्के आहे. यात प्रामुख्याने आयुर्वेद आहे. ७०टक्के लोकांनी कोविड-१९ मध्ये आयुष चिकित्सेचा उपयोग होतो असे सांगितले. असे प्रतिपादन एका वेबिनारमध्ये आयुष मंत्रालयाचे सचिव डॉ राजेश कोटेचा यांनी केले.
कोणताही रोग बरा होण्यासाठी औषध केव्हा व कसे घ्यावे,याला फार महत्त्व असते. आयुर्वेद शास्त्राने याचा विचार फार चांगल्या प्रकारे केला आहे. सकाळ, दुपार व रात्री असे दिवसातून तीन वेळा औषध घ्या, असे सांगणारी पद्धत आयुर्वेदाची नाही. ज्याप्रमाणे आहार ठराविक वेळेत घेतल्याने शरीरावर विशिष्ट परिणाम होतो. त्याप्रमाणे औषध घेण्याच्या वेळेनुसार आपण शरीरावर आवश्यक असा परिणाम घडवून आणू शकतो. हेच आयुर्वेद तज्ज्ञांनी औषध सेवन काळ सांगून सिद्ध केले आहे. औषध सेवन काळ हे रोग,रोगी, त्याची अवस्था,बल व औषधाचे विशिष्ट अवस्थेत घडून येणारे कार्य वा परिणाम यांचा विचार करून ठरविले आहेत. अयोग्य वेळी घेतलेले औषध सुद्धा उपयोगी पडत नाही, म्हणून सर्वसामान्यपणे शरीरातील कोणत्या भागातील रोगात औषध केव्हा घ्यावे याचे सर्वसामान्यांना ज्ञान व्हावे व घेतल्या जाणाऱ्या औषधाचा योग्य उपयोग व्हावा,यासाठी हे औषध सेवन काळ महत्त्वाचे आहेत.
औषध सेवन करण्याचे एकूण काळ १०आहेत.
१)अभक्त काळ(अन्न न घेता औषध घेणे) याचे दोन अर्थ होतात.
अ)सकाळी उठल्याबरोबर अनुशापोटी औषध घेणे
ब) बाकी काहीही न खाता फक्त औषधांवर राहणे.
काही पित्त व कफ दोषांच्या विकारात या काळात औषधे घ्यावीत.
२)प्राग्भक्त काळ(औषध घेऊन त्वरित काहीतरी खाणे वा जेवणे)- सामान्यतः नाभीखालच्या भागातील विकार,स्थौल्य, उष्ण असणारी औषधे या काळात घ्यावीत.
३)मध्यभक्त काळ(अर्धे जेवण झाल्यावर औषध घेणे व नंतर जेवण पूर्ण करण)-पचनाचे विकार,कुष्ठरोग, स्मृतीनाश, पित्तविकार यासारख्या आजारांसाठी या काळात औषध घेणे हितकारी असते.
४)अधोभक्त काळ(जेवूण पूर्ण झाल्यावर औषध घेणे)-नाभीच्या वरच्या भागात असलेल्या आजारांसाठी तसेच जाड होण्यासाठी या काळात औषध घेणे उपयुक्त असते.
५)ग्रासांतर काळ(प्रत्येक दोन घासाच्या मध्ये औषध घेणे)-दमा, श्वसनाचे व पचनाचे विकार या साठी या काळात औषधे घ्यावीत.
६)सग्रास काळ(प्रत्येक घासात औषध मिसळून घेणे)- ज्यांची भूक कमी झाली आहे वा भूक लागत नाही. त्यांनी या प्रकारे औषध घेतले असता अधिक लाभ होतो.
७)मुहमूर्ह:काळ(वारंवार औषधघेणे) दम्याचावेग(अटॅक), खोकला, उचकी,विषबाधा इ.विकारांच्या तीव्रवस्थेत या प्रमाणे औषध घेणे चांगले असते.
८)सभक्त काळ(अन्न पदार्थ(जेवण) तयार करीत असतानाच वा तयार झाल्यावर त्यात औषध मिसळणे.
-ज्या रुग्णांना औषध घेणे आवडत नाही वा औषधाचा वास सहन होत नाही.अशा रुग्णांनी अशा प्रकारे औषध घ्यावे.
उदा. आमवात(Rhematoid arthritis) या आजारावर एरंड तेल हे उत्कृष्ट औषध आहे,संशोधनाने ते उपयुक्त असल्याचे सिद्ध ही झाले आहे.परंतु बऱ्याच लोकांना ते घ्यायला आवडत नाही.अशा वेळी चपात्याची कणिक मळताना त्यात एरंड तेल घालून मळतात वा प्रत्येक चपातीस ते लावतात. दुर्बल, स्त्री,वृद्ध,औषधद्वेषी यांनी या प्रकारे औषध घ्यावे.
९)सामुग्ध काळ(जेवणापूर्वी वा जेवण पूर्ण होताच औषध घेणे)-अन्न पचनाशी संबंधित असे अजीर्ण,भूक न लागणे, उचकी,
पोट गच्च होणे वा दुखणे या विकारात या प्रकारे औषध घेणे चांगले असते.
१०)स्वप्नकाळ(रात्री झोपण्यापूर्वी औषध घेणे)- झोप न येणे,मेंदू,काना संबंधित विकार तसेच शौचास साफ न होणे,जंत या सारख्या आजारांसाठी या काळात औषध घेणे उपयुक्त असते.
आजच्या धावपळीच्या, धकाधकीच्या, घड्याळाच्या काट्याप्रमाणे चालणाऱ्या या जगात या सर्व औषध सेवनकाळानुसार औषध घेणे काठी आहे,असे म्हटले जाते व काही प्रमाणात ते सत्य ही आहे.परंतु काही गोष्टी चे पालन आपण करू शकतो. सामान्यतःआयुर्वेदिय सेवन काळाचा सिद्धांत कायम ठेवून रोगानुसार पुढीलप्रमाणे औषधे घेऊ शकतो.
विकार/आजार/रोग काळ
१)भूक न लागणे-जेवणापूर्वी अर्धा तास औषध घेणे.
२)अजीर्ण,अपचन,आम्लपित्त यासाठी जेवणापूर्वी वा जेवणानंतर १० ते१५ मिनिटाने.
३)सर्दी,खोकला, दमा यासाठी सकाळ,दुपार,संध्याकाळ व रात्री.
४)संधिवात,आमवात,हाडा संबधीत अन्य आजार या साठी ३ प्रमाणे ४ वेळा.
५)मेंदू,मानसिक आजार, डोकेदुखी,कान या साठी सकाळी व रात्री झोपताना.
६)बद्धकोष्ठता, मूळव्याध, भगंदर इ.जेवणानंतर व रात्री झोपताना.
७)मूत्राशय, मूत्रपिंड, सर्वांगावरील सूज इ.साठी शक्यतो रिकाम्यपोटी घ्यावे.
८)जाड होण्यासाठी-
जेवणानंतर
९) बारीक (कृश)होण्यासाठी- जेवणापूर्वी भरपूर पाण्यासह औषध घ्यावे.
१०)सर्दी, खोकला,दमा,उचकी, ज्वर, हृदय विकार इ.साठी वारंवार, १/२तासांनी.
लक्षात ठेवा,योग्य वेळी व योग्य काळी घेतलेले कोणतेही औषध अधिक गुणकारी व उपयोगी असते.असे दिसून येते.
शेवटी तुमच्या नेहमीच्या डॉक्टर ला तुमच्या बद्दल जास्त माहिती असते. म्हणून तुम्ही तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्याने तुमचा औषध घेण्याचा काळ ठरवा व आजारातून लवकर बरे व्हा.
डॉ. अंकुश जाधव
नवी मुंबई, इस्लामपूर (सांगली)










Leave a Reply