Election News : महापालिका निवडणूक: उद्या सकाळी प्रभाग रचना होणार जाहीर
Pckhabar- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीची प्रारुप प्रभाग रचना उद्या (मंगळवार) जाहीर होणार आहे. महापालिका मुख्य प्रशासकीय कार्यालय आणि आठ क्षेत्रीय कार्यालयात प्रारुप प्रभाग रचनेचे नकाशे सकाळी दहा वाजता प्रसिध्द केले जाणार आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी नकाशे ऑनलाईन पाहण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहेत, अशी माहिती महापालिकेचे निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब खांडेकर यांनी दिली.
आराखडा प्रसिध्द केल्यानंतर नागरिकांच्या हरकती व सूचना मागविल्या जाणार आहेत. नागरिकांना 1 ते 14 फेब्रुवारी दरम्यान हरकती सूचना सादर करता येणार आहेत. प्राप्त हरकती 16 फेब्रुवारी रोजी आयोगाला सादर कराव्या लागणार आहेत. 26 फेब्रुवारी रोजी या हरकतीवर सुनावणी घेण्यात येईल. सुनावणीनंतर प्राधिकृत अधिकाऱ्यांनी केलेल्या शिफारसी 2 मार्च 2022 रोजी निवडणूक आयोगाला पाठवावे लागणार आहे, तशा सूचना आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी महापालिकेला दिल्या आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक तीनसदस्यीय पद्धतीने होणार आहे. महापालिका प्रशासनाने प्रारुप प्रभाग रचनेचा कागदोपत्री प्रस्ताव 13 जानेवारी 2022 रोजी आयोगाला सादर केला होता. सदस्यसंख्या व आरक्षणाची परिगणना, हद्दींची व्याप्ती व वर्णनाबाबत, निवडणूक प्रभागांमध्ये समाविष्ट प्रगणक गट व लोकसंख्या, प्रगणक गटनिहाय माहिती, अनुसूचित जातीचा प्रभागनिहाय उतरता क्रम, अनुसूचित जमातीचा प्रभागनिहाय उतरता क्रम, सदस्य संख्या व आरक्षणाचे एकत्रित विवरणपत्र, प्रगणक गटाचे विभाजन करताना द्यावयाचे प्रमाणपत्र, समितीने प्रारुप प्रभाग रचनेबाबत द्यावयाचे प्रमाणपत्र अशी सविस्तर कागदोपत्री माहितीचा प्रस्ताव पाठविला होता.
महापालिका निवडणुकीसाठी प्रभागरचना आणि आरक्षण सोडत एकाचदिवशी जाहीर केली जाते. परंतु, ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीची प्रक्रिया थंडावली होती. ओबीसींच्या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचना अगोदर जाहीर करण्याचा निर्णय घेतला असून आरक्षण सोडत नंतर काढली जाणार आहे.










Leave a Reply