Dighi News : ‘दिघीकरांना पाण्यासाठी सुखाचे दिवस’, दिघीतील पाणी टाकी अवघ्या दोन तासात भरणार; रायझिंग मेन लाईन टाकण्याचे काम हाती
‘इ’ प्रभागाचे अध्यक्ष, नगरसेवक विकास डोळस यांची माहिती
Pckhabar- पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट झालेले आणि शहराचे शेवटचे टोक असलेल्या दिघीतील पाणीपुरवठ्याचा प्रश्न नगरसेवक विकास डोळस यांच्या प्रयत्नातुन निकाली निघणार आहे. भोसरी पंपिंग स्टेशनपासून दिघीतील पाणी टाकीपर्यंत पाणी नेण्यासाठी जास्त क्षमतेची पाण्याची लोखंडी पाईप लाईन (रायझिंग मेन) लाईन टाकण्यात येणार आहे. यामुळे पाणी टाकी भरण्याचा वेळ कमी होणार असून अवघ्या दोन ते अडीच तासात पाणी टाक्या पूर्ण भरतील. त्यामुळे दिघीतील विस्कळीत पाणीपुरवठ्याची समस्या कायमस्वरुपी निकाली निघणार आहे. पाणीपुरठ्यात दिघीकरांना सुखाचे दिवस अनुभवयाला मिळत आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत दिघीचा 1997 साली समावेश झाला. तेव्हापासून समाविष्ट गाव दिघी पाण्यासह विविध मुलभूत सुविधांपासून वंचित होते. महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत पहिल्यांद्याच निवडून आलेल्या विकास डोळस यांनी दिघीच्या विकासाचा ध्यास हाती घेतला. आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दिघीच्या सर्वांगीण विकासाला सुरुवात केली. अपु-या आणि अनियमित होणा-या पाणीपुरवठ्यामुळे दिघीकर हैराण होते. हा महत्वपूर्ण आणि नागरिकांच्या दैनंदिन आयुष्याशी निगडीत असलेला पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी नगरसेवक डोळस यांनी प्रशासनाकडे जोरदार पाठपुरावा सुरु केला.
चोवीस बाय सात अंतर्गत संपूर्ण दिघी प्रभागात पाण्याची लाईन टाकली. डोंगरपाथ्याजवळ 20 दक्षलक्ष लीटर पाणी टाकीचे काम पूर्ण केले. तसेच या पाणी टाकी शेजारीच 15 दक्षलक्ष लीटर क्षमतेच्या ‘संप’ आणि पंप हाऊसचेही काम सुरु असून ते अंतिम टप्प्यात आहे. भोसरी पंपिंग स्टेशनपासून दिघीकडे येणारी पाण्याची पाईप लाईन कमी म्हणजेच 400 मीमी व्यासाची होती. त्यामुळे दिघीतील तीन पाणी टाक्या भरण्यास विलंब होत असे. एक टाकी भरण्यास साधारणत: पाच तास लागत होते. परिणामी, सुरळीत पाणीपुरवठ्यास अडचणी येत होत्या. त्यावर मार्ग काढण्यासाठी 600 मीमी व्यासाची लोखंडी पाईप लाईन (रायझिंग मेन)ची लाईन टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याबाबच्या सव्वा सहा कोटी रुपयांच्या कामाला स्थायी समितीने मान्यता दिली असून कार्यारंभ (वर्क ऑर्डर) आदेशही दिला आहे. लवकरच त्याचे काम सुरु होईल, असे नगरसेवक डोळस यांनी सांगितले.
अवघ्या दोन तासात पाणी टाकी पूर्ण भरणार
या लाईनद्वारे भोसरी पंपिंग स्टेशनपासून दिघीतील टाकीपर्यंत पाणी नेण्यात येणार आहे. त्यामुळे पाणी टाकी भरण्याचा वेळ कमी होणार असून अवघ्या दोन ते अडीच तासात पाणी टाक्या पूर्ण भरणार आहेत. त्यामुळे टाकीत पाणी नसल्याचा आणि टाकी भरण्यास विलंब लागण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे. संपूर्ण दिघीला चांगल्या दाबाने पाणीपुरवठा करता येणार आहे. दिघीकरांना पुरेसा, नियमित आणि मुबलक पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे यापुढे दिघीत पाणीपुरवठ्याची समस्या उद्भभवणार नसल्याचा विश्वास नगरसेवक डोळस यांनी व्यक्त केला.










Leave a Reply