Chikhali News : मोरेवस्तीत पोलीस गस्त वाढविण्यासाठी ‘एसीपीं’ना साकडे

Chikhali News : मोरेवस्तीत पोलीस गस्त वाढविण्यासाठी ‘एसीपीं’ना साकडे

शिवसेनेच्या शिष्टमंडळाने घेतली सहायक पोलीस आयुक्तांची भेट
Pckhabar- मोरेवस्ती परिसरातील वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी या परिसरात पोलीस गस्त वाढविण्यासाठी शिवसेना उपशहरप्रमुख नेताजी काशिद यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शुक्रवारी सहायक पोलीस आयुक्त संजय नाईक पाटील यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. त्यावर जादा पोलीस कर्मचारी उपलब्ध करण्याची मागणी गृहखात्याकडे केली आहे. सध्या सर्वच भागात पोलीस गस्त सुरु आहे. ग्रामसुरक्षा दलाच्या धर्तीवर पोलीस मित्रांच्या मदतीने परिसरात गस्त घालणे शक्य आहे. अशा पोलीस मित्रांना योग्य ते सहकार्य करण्यास पोलीस प्रशासन तयार असल्याचे आश्वासन सहायक पोलीस आयुक्त संजय नाईक पाटील यांनी दिल्याची माहिती काशिद यांनी दिली.

मोरेवस्ती परिसरात गुन्हेगारी कृत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये अल्पवयीन टोळक्यांचा उपद्रव चिंतेचा विषय बनला आहे. महिला, मुलींची छेडछाड, त्यांचा पाठलाग करणे आदी प्रकार राजरोस घडत आहेत. रात्री अपरात्री कामावरून घरी परतणाऱ्या कामगारांना अडवून त्यांच्याकडील रोकड आणि मुद्देमाल हिसकावून घेणे, त्यांना मारहाण करणे असे प्रकारही अधूनमधून घडत आहेत. या भागातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी परिसरात पोलीस गस्त वाढवावी, अशी मागणी शिवसेनच्या वतीने करण्यात शुक्रवारी ( दि. २८) सहायक पोलीस आयुक्त संजय नाईक पाटील यांच्याकडे केली. शिवसेना उपशहरप्रमुख नेताजी काशिद, यांच्यासह गणेश अवचिते, आलोक पाटील, रमेश सांगडे उपस्थित होते.

या पूर्वीसुद्धा नेताजी काशिद यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने याच प्रश्नावर चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत बाबर आणि पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांना निवेदन दिले होते. मोरेवस्ती, साने चौक, म्हेत्रे वस्ती अष्टविनायक चौक ते वाघू साने चौक या रस्त्यावर छेडछाड करण्याचे प्रकार घडत आहेत. काही ठिकाणी मद्यपींची टोळकी अंधाराचा फायदा घेत खुलेआम मद्यपान करत बसलेली असतात. त्याचा महिलांना नाहक त्रास सहन करावा लागतो. एकूणच मोरेवस्ती परिसरात गुन्हेगारीत वाढ होऊ लागली आहे. यासाठी या परिसरात शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळी तसेच रात्रीच्यावेळी पोलीस गस्त वाढविण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *