Dehu political News : खासदार सुप्रिया सुळे उद्या देहूत; नवनिर्वाचित नगरसेवकांचा करणार सत्कार
देहू राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश हगवणे यांची माहिती
Pckhabar- बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे उद्या (शनिवार) देहू दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी देहू नगरपंचायतीच्या निवडणूकीत विजयी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा खासदार सुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक, मुख्य प्रवेशद्वार, श्री क्षेत्र देहू येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाचे उद्घाटन समारंभही खासदार सुळे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
याबाबत देहू राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश हगवणे यांनी माहिती दिली.
देहू ग्रामपंचायतीचे रूपांतर होऊन प्रथमच झालेल्या नगरपंचायतीच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे 14, दोन अपक्ष आणि एक भाजपचा नगरसेवक निवडून आला आहे. त्यामुळे देहू राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
देहू नगरपंचायतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता खासदार सुळे उद्या (शनिवार) सकाळी नऊ वाजता देहू दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी पक्ष कार्यालयात पक्षाच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा खासदार सुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला देहू राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन देहू राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश हगवणे यांनी केले.










Leave a Reply