Election News : देहू नगरपंचायत नगराध्यक्ष पद अनुसूचित जातीसाठी राखीव
स्मिता चव्हाण आणि पूजा दिवटे यांच्यापैकी एका नगरसेविकेला मिळणार संधी
Pckhabar- नव्याने निर्माण झालेल्या तीर्थक्षेत्र देहू नगरपंचायतीसह राज्यातील 139 नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी आज आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. देहू नगरपंचायतीच्या प्रथम नगराध्यक्ष पदासाठी अनुसूचित जाती महिलेसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे, अशी माहिती देहू नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव यांनी दिली.
अनुसूचित जाती या प्रवर्गातून प्रभाग क्रमांक तीन मधून पूजा दिवटे आणि प्रभाग क्रमांक 8 मधून स्मिता चव्हाण या निवडून आल्या आहेत. प्रथम नगराध्यक्ष पद मिळविण्यासाठी दिवटे आणि चव्हाण यांच्यात रस्सीखेच निर्माण होणार आहे. तर मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील शेळके कोणाला संधी देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी आज मुंबई येथे मंत्रालयात आरक्षण सोडत ऑनलाईन पद्धतीने काढण्यात आली. यासाठी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी विभागीय आयुक्त अधिकारी, जिल्हा प्रशासन अधिकारी, नगरपंचायतीचे 10 नगरसेवकांना सोडतीसाठी उपस्थित राहण्याची मुभा देण्यात आली होती.
राज्यातील 139 नगरपंचायतीची दोन टप्प्यात निवडणूक पार पडली. देहू ग्रामपंचायतीचे रूपांतर होऊन प्रथमच झालेल्या नगरपंचायतीच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे 14, दोन अपक्ष तर एक भाजपचा नगरसेवक निवडून आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचाच नगरसेवक नगराध्यक्ष होणार आहे.
नगरपंचायतीचे प्रथम नगराध्यक्ष होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मातब्बर नगरसेवकांनी फिल्डिंग लावली होती. मात्र, आरक्षण अनुसूचित जाती महिलेचे पडल्यामुळे अनेक नगरसेवकांचा हिरमोड झाला आहे.










Leave a Reply