लोणावळ्यात सार्वजनिक ठिकाणी जेष्ठांना संचारबंदी
Pckhabar- कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोणावळा शहरात सार्वजनिक ठिकाणी जेष्ठांना संचारबंदी करण्याचा निर्णय लोणावळा नगरपरिषदेने घेतला असून तशी घोषणा मुख्याधिकारी रवि पवार यांनी केली आहे. तसेच १५ ऑगस्ट पासून लोणावळा शहरातील संजीवनी हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णांसाठी आवश्यक असणारे सर्व सुविधायुक्त कोविड केअर सेन्टर सुरू होणार असल्याची माहिती दिली.
मुख्याधिकारी रवि पवार यांनी वरील निर्णयाबाबत काही सूचना लोणावळेकर नागरिकांना दिल्या आहेत. कोरोनामुळे बाधित झालेल्या जेष्ठ नागरिकांचे बरे होण्याचे प्रमाण तुलनेत कमी असल्याने त्यांचे मृत्यू प्रमाण देखील इतरांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे अशा जेष्ठ नागरिकांची जास्त काळजी घेण्याची आवश्यकता निर्माण झाली असल्याचे मुख्याधिकारी पवार यांनी सांगितले. त्यामुळे शुक्रवार दिनांक १४ ऑगस्ट पासून ३१ ऑगस्ट पर्यंत ६० वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणं तसेच सार्वजनिक ठिकाणी येणं टाळायचं आहे असे सांगत वैद्यकीय कारणास्तव किंवा अत्यावश्यक कार्यालयीन कामकाज उरकण्यासाठी अपवादात्मक परिस्थिती वगळता यापुढे विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या जेष्ठांना आर्थिक दंड किंवा आवश्यकता वाटल्यास पोलिसांच्या मदतीने गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली जाईल अशा स्पष्ट सूचना मुख्याधिकारी रवि पवार यांनी दिल्या आहेत.
आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून लोणावळा शहरात सर्व विभागात वेगवेगळ्या दिवशी जेष्ठ नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी एक सुसज्ज अशी व्हॅन फिरणार आहे. ज्यात जेष्ठ नागरिकांचे छातीचे एक्सरे, ईसीजी, मधुमेह तपासणी, रक्तदाब तपासणी करण्यात येणार आहे. याचा फायदा सर्वांना होणार असून ही व्हॅन कोणत्या विभागात कधी असेल यासंदर्भातील वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. या सुविधेचा लाभ सर्व जेष्ठांनी घ्यावा असे आवाहन मुख्याधिकारी पवार यांनी केलं आहे.










Leave a Reply